Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात 6 पैकी एका मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची आघाडी; 5 मतदारसंघात कौल कुणाला?
बेळगावमध्ये एकीकरण समितीचा उमेदवार फक्त बेळगाव उत्तरमध्ये आघाडीवर आहे. बेळगाव ग्रामीण, निपाणी आणि बेळगाव दक्षिणमध्ये समितीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या निवडणुकीत समितीला यश येतं की नाही हे पाहावं लागणार आहे.
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला जवळपास 131 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे. जेडीएसलाही केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. भाजपप्रमाणेच काँग्रेससाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची होती. असं असलं तरी महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीकडे लागलं होतं. समितीचे उमेदवार काय कामगिरी करतात याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, समितीला फारसं यश मिळताना दिसत नाहीये.
बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या सहा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या सहाही मराठी बहुल मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार दिले होते. त्यामुळे या सहा मतदारसंघात एकीकरण समितीला विजय मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
या सीमावर्ती भागात राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार दिले होते. ठाकरे गटाने या सहाही मतदारसंघात एकीकरण समितीसाठी प्रचार केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठी माणसालाच मतदान करण्याचं आवाहन बेळगावातील मराठी मतदारांना केलं होतं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.
समितीचा उमेदवार पराभूत
बेळगाव दक्षिणमध्ये समितीकडून रमाकांत कोंडूर उभे होते. त्यांना 5993 मते मिळाली. त्यांना भाजपचे अभय पाटील यांनी पराभूत केलं. पाटील यांना 69468 मते मिळाली. बेळगाव उत्तरमध्ये काँग्रेसचे आसिफ उर्फ राजू शेठ उभे होते. ते 35716 मते मिळवून आघाडीवर होते. तर भाजपचे रवी पाटील 32792 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. समितीचे अमर येळ्ळूरकर हे अवघे 5645 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते.
निपाणीत हाराकिरी
बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर 62604 मते घेऊन आघाडीवर आहेत. समितीचे आर. एम. चौगुले समिती 33948 मते घेऊन दुसऱ्या तर भाजपचे नागेश मन्नोळकर 21783 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. निपाणीत भाडपच्या शशिकला जोल्ले 39119 मते घेऊन आघाडीवर होत्या. या ठिकाणी राष्ट्रवादीचे उत्तम पाटील हे दुसऱ्या क्रमांकाची 36475 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे काकासाहेब पाटील 23314 मते घेऊन तिसऱ्या आणि समितीचे जयराम मिरजकर 186 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर होते. निपाणीत समितीचा फारसा प्रभाव दिसला नाही. मराठी माणसांची मोठी संख्या असूनही निपाणीत समितीला मतांची बेगमी करता आली नाही.
काँग्रेस-भाजपचं वर्चस्व
यमकनर्डीमध्ये काँग्रेसचे सतीश जारकोहोळ 70624 मते घेऊन आघाडीवर आहेत. भाजपचे बसवराज हुंदरी 28741 मते घेऊन दुसऱ्या तर समितीचे मारुती नाईक 1259 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातही समितीला विशेष कामगिरी करता आलेली नाही. खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर हे 56445 मते घेऊन आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अंजली निंबाळकर या 19087 मते आणि समितीचे मुरलीधर पाटील 8501 मते घेऊन आघाडीवर आहेत.