“इथे अत्यंत वाईट परिस्थिती..”; EVM मशीन बंद असल्याने आदेश बांदेकर संतापले
अभिनेते आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची तक्रार केली आहे. दोन-तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर मतदार घरी परतत आहेत, असंही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी या जागांवर मतदान होत आहे. सर्वसामान्यांसह विविध सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोतले आहेत. मात्र काही ठिकाणी मतदारांना त्रास सहन करावा लागतोय. अभिनेते आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत संताप व्यक्त केला आहे. पवईतील एका मतदान केंद्रावरून त्यांनी हे लाइव्ह केलं होतं. 57 आणि 58 या दोन्ही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार त्यांनी केली.
इन्स्टा लाइव्हमध्ये आदेश बांदेकर म्हणाले, “मी आता पवईतील एका मतदान केंद्रावर आहे. हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर आहे. इकडच्या 57, 58 या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. सगळ्या मशिनरी बंद आहेत. तीन-तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर काहीजण घरी जात आहेत. दोन तासांपासून आम्ही उन्हात प्रतीक्षा करतोय. कोणी उत्तरच देत नाहीयेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमधील मतदान केंद्रावर ही परिस्थिती आहे. वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत.” या लाइव्हदरम्यान बांदेकरांनी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनाही प्रतिक्रिया विचारल्या आहेत. त्यांनीसुद्धा याविषयी संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
“लोकशाहीचा हा उत्सव आहे. पाच वर्षांपासून यासाठी तयारी केली जाते. पण इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. इथले लोक खूप चिडले आहेत. मी स्वत: दोन-तीन तासांपासून थांबलोय. मला माझ्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. मशीन बंद पडतात आणि दोन-दोन तास त्यावर काही उपाय होत नाही, हे अत्यंत वाईट आहे”, अशा शब्दांत बांदेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘निवडणूक आयोगाचा बेशिस्तीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी लोकांना मतदान करता आलेलं नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. या काराभाराविरोधात जनहित याचिका दाखल केली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला कोर्टात खेचलं पाहिजे,’ असं एकाने लिहिलंय. तर हीच का लोकशाही? याला जबाबदार कोण? असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे.