‘मतमोजणीवेळी ‘त्या’ अधिकारी वारंवार बाथरुममध्ये का जात होत्या?,’ ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खरमरीत सवाल
EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कालच केलेल्या आरोपानंतर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक देशभरात गाजत आहे. इलॉन मस्क यांनी देखील EVM वरुन पोस्ट केली होती.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निकालाची जगभर चर्चा सुरु आहे. टेस्ला आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील निवडणूकीच्या संदर्भ घेऊन EVM च्या धोक्याचा इशाऱ्याचे ट्वीट केले होते. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टॅग करीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या मतमोजणीनंतर आलेल्या बातमीचा संदर्भ देत ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असल्याचे म्हटले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निवडणूकीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. आधी ईव्हीएम मोजणीनंतर एक मतांनी अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला होता. त्यानंतर फेर मतमोजणीची मागणी झाली. अखेर पोस्टल बॅलेटमध्ये रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यातच आता शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या अधिकृत प्रतिनिधी ऐवजी भलत्याच व्यक्तीचा शिरकाव झाल्याचा आरोप केला होता. त्याने मोबाईलद्वारे ईव्हीएमला अनलॉक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा खुलासा केला होता.
सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत ?
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही 4 जूनच्या घटनेचा सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे. परंतू निवडणूक आयोग आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज देण्यास नकार दिला आहे. जर तुमची निवडणूक मतमोजणी पारदर्शक असेल तर सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतमोजणी केंद्रात ज्या प्रतिनिधीच्या मोबाईल फोनवरुन गडबड झाली त्या प्रकरणाची फिर्याद पोलिसांना दिल्यानंतर 10 दिवसांनी कारवाई झाली असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. तक्रार 4 जूनला झाली आणि कारवाई दहा दिवसांनी केली गेली. त्याकाळात मोबाईल देखील बदलला असावा असा आमचा स्पष्ठ आरोप असल्याचे परब यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी वारंवार
जेव्हा चुकीचा प्रतिनिधी मोबाईल घेऊन घुसल्याचे उघड झाले तेव्हा गोंधळ उडाला. तक्रारीनंतर त्याचा जर मोबाईल जप्त झाला. तर त्याने उर्वरित डिटेल्स त्या प्रतिनिधीने कोणत्या मोबाईल फोनवरुन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वारंवार बाथरुमला जात होत्या. त्यावेळी कोणाशी तरी बोलत होत्या. 19 व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीचे आकडे जाहीर केले जात होते. नंतर दोन्ही उमेदवारांचे आकडे जवळ आले तसे माहीती देणे बंद झाले ते थेट 22 व्या फेरी वेळीच आकडे जाहीर केले. अंतिम निर्णय जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ( आरओ ) कोणाला काही हरकत आहे का ? असे विचारले नाही थेट निकाल जाहीर केला असे अनिल परब यांनी सांगितले. याबाबत आमच्याकडे सगळी माहीती आलेली आहे, आम्ही या निकालाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आयोगानेच सुमोटा कारवाई करावी
खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते ॲड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत 19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी पारदर्शकता बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितले. निवडणूक आयोगाने याची सुमोटो ॲक्शन केली पाहीजे अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.