Washim Yavatmal Election Final Result 2024 : यवतमाळमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचा झेंडा, संजय देशमुख यांची शिंदे गटाला धोबीपछाड
Washim Yavatmal Lok Sabha Election Final Result 2024 : यवतमाळ वाशीममधील जनतेने पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा पराभव केला.
भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केलेले संजय देशमुख यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा 93408 मतांनी पराभव केला. मतमोजणीच्या 30 व्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना 5,91,405 तर राजश्री पाटील यांनी 497997 मते मिळाली. या निकालाने यवतमाळमधील जनतेने पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 6 आमदार असतानाही संजय देशमुख यांनी विजयश्री खेचून आणली. संजय देशमुख हे माजी राज्य मंत्री आहेत.
राज्यात ज्या लक्षवेधी लढती होत आहे त्यापैकी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ ( Washim Yavatmal loksabha Constituency ) आहे. यापूर्वी हा मतदारसंघ खामगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 1977 मध्ये या मतदारसंघाचे वाशिम लोकसभा मतदारसंघ असे नामकरण झाले आणि 2008 साली यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. शिवसेना ठाकरे गटाचे (UBT Shivsena Party) संजय देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत झाली. भाजपमधून घरवापसी केलेले संजय देशमुख ( Sanjay Deshmukh candidate of Shivsena Thackeray Group ) हे माजी राज्य मंत्री आहेत. यवतमाळचे शिंदे गटातील आमदार संजय राठोड हे संजय देशमुख यांचे राजकीय विरोधक आहेत. तर, शिंदे गटाने या निवडणुकीत पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांच्याऐवजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील ( Rajshree Patil Candidate of Shivsena Shinde Group ) यांना उमेदवारी दिली.
कोण आहेत संजय देशमुख ?
1998 मध्ये शिवसेनेमधून संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांनतर पुन्हा 2004 मध्ये दिग्रस मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले. पण, 2009 मध्ये तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता.
शिवसेनेचा बालेकिल्ला
भावना गवळी यांच्यामुळे यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. भावना गवळी सलग पाच टर्म या मतदारसंघाच्या खासदार होत्या. मात्र, त्यांच्याविरोधातील अँटी इन्कम्बन्सी आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे त्यांची उमेदवारी डावलण्यात आली आणि राजश्री पाटील यांचे नाव पुढे आले.
2014 च्या निवडणुकीत भावना गवळी यांनी कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला, भावना गवळी यांना 5 लाख 42 हजार 098 मते मिळाली होती. तर, मोघे यांनी 3 लाख 84 हजार 089 मते घेतली होती. 2019 च्या निवडणुकीतही भावना गवळी यांनी 5 लाख 42 हजार 098 मते घेऊन कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे याचा पराभव केला. ठाकरे यांना 4 लाख 24 हजार 159 मते मिळाली होती.
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 9 लाख 26 हजार 406 इतक्या महिला मतदारांची मते निर्णायक ठरतील. विशेष म्हणजे या महिला मतदारांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख महिलांचा मेळावा यवतमाळमध्ये घेतला होता.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स