UP Assembly Election 2022 : योगी आदित्यनाथ कुठून निवडणूक लढणार? जवळपास ठरलंच!
Yogi Adityanath : अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या निर्माण कार्याचं काम सुरु आहे. हे काम प्रगतिपथावर तर आहेत. शिवाय अयोध्येत भाजपच्या बाजूने मतदार आपला कौल देतील, अशी शक्यताही वर्तवली जाते आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) रिंगणात कोणत्या मतदारसंघातून उतरतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आजतकच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी योगी आदित्यनाथ हे लोकसभेचे खासदार होते. लोकसभेच्या गोरखपूर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेच्या खासदारीकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर विधानपरीषदेतून त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत प्रवेश केला होता. विधानपरीषदेसाठी योगी आदित्यनाथ यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदची देण्यात आलं होतं. आता योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप उत्तर प्रदेश (BJP Uttar Pradesh) हे 2022च्या विधानसभा निवडणुकीला सामोरी जाते आहे. दरम्यान, अद्याप भाजपनं अधिकृतपणे योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्येतील उमेदवारीबाबत घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
तीनपैकी एक जागा नक्की
योगी आदित्यनाथ हे आतापर्यंत कुठून निवडणूक लढवणार हे, स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र त्यांच्या निवडणूक लढवण्याची जागा नेमकी कुठली असेल, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. तीन ठिकाणांहून योगी आदित्यनाथ निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होता. काशी (वाराणसी), आयोध्या किंवा मग मथुरेत योगी आदित्यनाथ निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आता योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आजतकच्या सूत्रांनी दिली आहे. अयोध्येतील विकासकामांना योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर गती आल्यामुळे ते या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातील, अशी माहिती समोर आली आहे.
अच्छा… म्हणून अयोध्या
अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या निर्माण कार्याचं काम सुरु आहे. हे काम प्रगतिपथावर तर आहेत. शिवाय अयोध्येत भाजपच्या बाजूने मतदार आपला कौल देतील, अशी शक्यताही वर्तवली जाते आहे. त्यामुळे अयोध्येतून योगी आदित्यनाथ निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय.
सुरुवातीच्या टप्प्यात मथुरेत योगी आदित्यनाथ निवडणूक लढवतील असं सांगितलं जात होतं. मात्र अखेर आता रामनगरी अयोध्येतूनच योगी आदित्यनाथ हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं आजतकच्या सूत्रांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवणुकीच्या पहिल्या टप्प्याला 14 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. तर 10 मार्चला या निवडणुकीचा निकाल लागणर आहेत.
काय आहे सध्याचं उत्तर प्रदेशातील पक्षीय बलाबल?
उत्तर प्रदेश -एकूण जागा 403
भाजप 325 समाजवादी पक्ष 47 बसपा 19 काँग्रेस 7
ओपनियन पोलचा अंदाज काय सांगतो?
एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेनुसार 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यताय.
2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.
संबंधित बातम्या –
Assembly Elections 2022 : यूपी, गोव्यासह मणिपुरात कमळ कोमेजणार? ओपनिअन पोल भाजपचं टेन्शन वाढवणारा