काँग्रेसशी युतीवरून वडेट्टीवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, युतीबाबत वडेट्टीवार म्हणतात…
गोव्यात काँग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यांना आता विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसापासून पाच राज्याच्या निवडणूक (Election 2022) तोफा वाजत आहे. त्यामुळे देशभरातला राजकीय माहौल बदलला आहे. सर्वांच्या नजरा या निवडणुकांकडे लागल्या आहेत. उत्तर प्रदेशात (Up elections 2022) तर योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुका जरी बाहेरील राज्यातील असल्या तरी त्यांनी महाराष्ट्रातील वातावरणही तापलं आहे. इतर राज्यातही काँग्रेसशी युती व्हावी असे संजय राऊतांकडून वारंवार बोललं जातंय. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्यात काँग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यांना आता विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत. त्यामुळे गोवा व इतर राज्यात युती बाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
एक अंकी जागा शिवसेनेच्या येतील
गोव्यात कॉंग्रेसला अतीआत्मविश्वास नडणार असून गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या संजय राऊत यांच्या गोवा कॉंग्रेसवर टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत चांगलाच समाचार घेतला आहे. ते भंडाऱ्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचार दरम्यान बोलत होते. संजय राउत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्याच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे सूचक विधान ही वड्डेट्टीवार यांनी केला असून संजय राउत यांच्या वक्त्वयाचा कोणताही फरक पडत नसल्याचे वड्डेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना त्यांनी काँग्रेसला टोले लगावले. काँग्रेसचं माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्यांना असं वाटतं 40 पैकी 45 जागा मिळतील. पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असं त्यांना वाटतं. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षावला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी 40 पैकी 45 जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.