एक्स गर्लफ्रेंडसोबत ‘टाइमपास करत होतो’ म्हटल्यानंतर आदर जैनची सारवासारव
गेली चार वर्षे मी टाइमपास करत होतो, असं वक्तव्य स्वत:च्याच मेहंदी कार्यक्रमात केल्यानंतर आदर जैनला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. आदर आणि तारा सुतारिया एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर आदरने तिचीच खास मैत्रीण आलेखाशी लग्न केलं.

राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करीना कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैनचं गेल्या महिन्यात थाटामाटात लग्न पार पाडलं. गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी त्याने लग्नगाठ बांधली. आलेखाशी लग्न करण्यापूर्वी आदर हा प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. विशेष म्हणजे आदरची पत्नी आलेखा ही ताराचीसुद्धा खास मैत्रीण होती. अशातच मेहंदी कार्यक्रमात सर्वांसमोर आलेखाविषयीचं प्रेम व्यक्त करताना आदरने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला अप्रत्यक्षपणे टोमणा मारला होता. “गेल्या चार वर्षांपासून मी टाइमपास करत होतो”, असं तो म्हणाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदरवर नेटकऱ्यांनी खूप टीका केली होती. अखेर ट्रोलिंगनंतर आदर आणि आलेखाने त्यावर आपली बाजू मांडली आहे.
नेमकं काय म्हणाला होता आदर?
“मी नेहमीच तिच्यावर प्रेम केलंय आणि मला तिच्यासोबतच राहायचं होतं. म्हणून तिने मला टाइमपासमधून 20 वर्षांच्या या लांब प्रवासावर पाठवलंय. पण हे सर्व प्रतीक्षा करण्यासारखं होतं. कारण मला या सुंदर स्त्रीशी लग्न करायचं होतं, जी स्वप्नवत दिसतेय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि ही प्रतीक्षा समाधानकारक होती. हे एक गुपित आहे की मी नेहमीच तिच्यावर प्रेम केलंय. मी माझ्या आयुष्यातील चार वर्षे टाइमपास केला, पण आता मी तुझ्याचसोबत आहे बेबी”, असं तो म्हणाला होता.




View this post on Instagram
ट्रोलिंगनंतर आदरचं स्पष्टीकरण
मी चार वर्षे नव्हे तर 20 वर्षे असं म्हटलं होतं, याकडे आदरने लक्ष वेधलं. त्याने असंही पुढे म्हटलं की त्याचे शब्द आणि त्याचं मौन या दोन्हीचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आदर म्हणाला, “कोणत्याही पार्श्वभूमीची व्यक्ती असो, त्यांचा आदर करण्याची शिकवण मला कुटुंबातून मिळाली आहे. लोकांनी माझ्या भाषणातील एक छोटी क्लिक व्हायरल केली आणि त्यावरून त्यांच्या सोईनुसार अर्थ काढले. हे तिच्यासाठी (आलेखाकडे बोट दाखवत) आणि तिच्या कुटुंबीयांसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी त्याचप्रमाणे तारा आणि तिच्या कुटुंबीयांसाठीही अन्याय्य आहे. आलेखा ही माझी सर्वांत जुन्या मैत्रिणींपैकी एक आहे आणि तिलासुद्धा परिस्थितीचं सत्य समजलं आहे. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. त्यामुळे एखादं रिलेशनशिप अयशस्वी ठरलं म्हणून तुम्ही दुसऱ्याला त्यासाठी दोषी ठरवू शकत नाही.”
आलेखानेही दिलं उत्तर
आदरने मांडलेल्या बाजूला दुजोरा देत आलेखा म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतोय. मला त्याच्या आयुष्यातील काही ठराविक गोष्टी नाही तर संपूर्ण सत्य माहीत आहे. इतकंच काय तर तारालाही ही गोष्ट माहीत आहे की आदर आणि मी खूप आधीपासून चांगले मित्र आहोत. त्यामुळे हे सर्व जे पसरवलं जातंय ते अर्थहीन आहे.”
आदर आणि आलेखा यांनी 21 फेब्रुवारी रोजी धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नाला संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते. करीना कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर हे सर्व लग्नाला हजर होते. याशिवाय बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटीसुद्धा लग्नसोहळ्याला उपस्थित होते.