रिसेप्शन आयराचं चर्चा मात्र त्या एका व्यक्तीचीच; एकेकाळी आमिरला म्हटलं होतं ‘संधीसाधू’
आता बऱ्याच वर्षांनंतर जुनी भांडणं विसरून फैजल आणि आमिर एकत्र आले आहेत. फैजल आणि आमिर यांच्या नात्यात एकेकाळी खूप कटुता निर्माण झाली होती. फैजलने आमिरवर अनेक आरोप केले होते. इतकंच नव्हे तर आमिरच्या घरात मला बंदिस्त ठेवण्यात आलं होतं, असंही तो म्हणाला होता.
मुंबई : 15 जानेवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. आधी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न, त्यानंतर उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनुसार एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं दिल्यानंतर आता मुंबईत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी जंगी रिसेप्शनचं आयोजन केलं. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील असंख्य कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत एका व्यक्तीच्या एण्ट्रीने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं. रिसेप्शनला जेव्हा फैजल खानने हजेरी लावली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या. कारण फैजल हा आमिरचा सख्खा भाऊ आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या दोन भावंडांमध्ये बरेच वादविवाद सुरू आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फैजल खान हा आमिरचा मुलगा जुनैदसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘दोघांमधील भांडण मिटलं का’, असा प्रश्न एकाने केला. तर ‘सर मेला 2 कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार’, असं दुसऱ्याने विचारलं. फैजलने कयामत से कयामत तक, जो जिता वही सिकंदर, मदहोश, मेला, काबू, दुश्मनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2003 मध्ये त्याने आंधी या मालिकेतही भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
आमिर-फैजलचा वाद
फैजलने एकेकाळी आमिरवर गंभीर आरोप केले होते. ‘मेला’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही. एका मुलाखतीत फैजलने भाऊ आमिरला ‘संधीसाधू’ असं म्हटलं होतं. 2007-08 मध्ये फैजलने त्याच्या कुटुंबीयांविरोधातील कायदेशीर लढाई लढली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं होतं की, “मी कधीच आजारी नव्हतो. आतापर्यंत ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्या सर्व खोट्या आहेत. माझा मोठा भाऊ आमिर खान आणि इतर कुटुंबीयांनी त्या अफवा पसरवल्या आहेत. किंबहुना, माझं अपहरण करण्यात आलं होतं. मला घरात बंदिस्त केलं गेलं, औषधं दिली गेली. मला सामान्य व्यक्तीप्रमाणे जगायचं आहे.”