Nitin Desai | बॉलिवूड इंडस्ट्रीतून कोणी नितीन देसाई यांची मदत का केली नाही? आमिर खानने दिलं उत्तर
अंत्यविधी पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिनेता आमिर खानने देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 'लगान' या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. देसाई यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही, असा प्रश्न यावेळी आमिरला विचारण्यात आला.
अलिबाग | 5 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेते, अभिनेत्यांसह चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमिर खान, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आशुतोष गोवारिकर यांसारखे सेलिब्रिटी अंत्यदर्शनाला उपस्थित होते. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला आत्महत्या केली होती. अंत्यविधी पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिनेता आमिर खानने देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘लगान’ या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. देसाई यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही, असा प्रश्न यावेळी आमिरला विचारण्यात आला.
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना आमिरने आधी नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला. “ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. हे सर्व कसं झालं हे मला अजूनही समजत नाहीये. मला त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांनी असं टोकाचं पाऊल न उचलता मदत मागितली असती तर बरं झालं असतं. पण अशा परिस्थितीत मी काय बोलू शकतो, कारण जे काही घडलंय ते सर्व समजण्यासाठी खूपच कठीण आहे. आम्ही एका अत्यंत प्रतिभावान कलाकाराला गमावलं आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
बॉलिवूडमधून नितीन देसाईंची कोणी मदत का केली नाही, असा सवाल यावेळी पत्रकारांनी आमिरला केला. त्यावर तो पुढे म्हणाला, “कोणालाच त्याविषयी माहीत नव्हतं.” देसाई यांच्या अंत्यविधीला इंडस्ट्रीतून फार कमी कलाकार उपस्थित होते, असं म्हटल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना आमिर म्हणाला, “कदाचित काही लोकं येऊ शकले नसतील, वेगळ्या कारणामुळे. मला खात्री आहे की प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्यासाठी अत्यंत खास जागा आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मी धैर्य राखण्यास सांगेन.”
नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आऱोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.