AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss 16 : एकेकाळी रस्त्यावर गाणी म्हणणारा आज ‘बिग बॉस’मध्ये सर्वांना देतोय टक्कर

एकवेळ अशीदेखील होती की अब्दू गावच्या बाजारात रस्त्यावर गाणी गायचा. पण नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. त्यामुळे अब्दू ताजिकिस्तान सारख्या छोट्या देशातून.....

Big Boss 16 : एकेकाळी रस्त्यावर गाणी म्हणणारा आज 'बिग बॉस'मध्ये सर्वांना देतोय टक्कर
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 4:18 PM

मुंबई : आपण यशस्वी होणं सोपं नसतं. त्यासाठी आपल्याला खूप खस्ता खाव्या लागतात. अनेकदा अपमान सहन करावा लागतो. तो गिळावा लागतो. एकांतात गहिवरून रडावं लागतं. चिक्कार कष्ट करावे लागतात. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेतून आपली माणूस म्हणून आधी जडणघडण होते. सच्चा माणूस बनायलाही अपार कष्ट घ्यावे लागतात. आपलं काहीतरी स्वप्न आहे हे कळण्याइतपत आपल्याला सुजाण व्हावं लागतं. आपण आपलं ज्यादिवशी ध्येय ठरवतो त्याचदिवशी आपला यशाच्या मार्गाचा प्रवास सुरू झालेला असतो. हा प्रवास अर्थातच खूप कठीण असतो. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याचा जल्लोषही तितकाच मोठा असतो. आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी तरूणाविषयी माहिती देणार आहोत.

आपली जिद्द आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकते याचा कधीकधी आपणही अंदाज लाऊ शकत नाही. आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, ही जिद्द मनात तेवत राहिली पाहिजे‌. आपण या जगात काहीही करू शकतो. काहीही मिळवू शकतो. त्यासाठी शेकडो अडचणी येऊ द्या, संकटांचा कितीही मोठा डोंगर उभा राहू द्या. आपली काम करण्याची तयारी, मेहनत आणि जिद्द यामुळे आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो. अशाच यशस्वी, गोंडस तरूणाच्या संघर्षाची कहाणी आज आम्ही सांगणार आहोत. हा तरूण म्हणजे सध्या हिंदी बिग बॉस सिझन १६ मध्ये आपलं नाव गाजवणारा अब्दू रोजिक!

हे सुद्धा वाचा

अब्दू रोजिक उर्फ ​​सावरीकुल मुहम्मदरोझिकी याचा जन्म 23 सप्टेंबर 2003 रोजी ताजिकिस्तान देशाच्या पंजकेंट जिल्ह्यातील गिशदारवा येथे झाला. त्याच्या जन्मतारखेनुसार त्याचं सध्याचं वय जवळपास 19 वर्षे इतकं आहे. अब्दू रोजिक आज आपल्याला टीव्हीवर दिसतो. तो बिग बॉस सिझन 16 मध्ये लाखो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक झालाय. तो आज जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. पण त्याचा प्रवास हा सोपा नव्हता.

एकवेळी अशीदेखील होती की अब्दू गावच्या बाजारात रस्त्यावर गाणी गायचा. पण नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. त्यामुळे अब्दू ताजिकिस्तान सारख्या छोट्या देशातून दुबई सारख्या मोठ्या देशाचा नागरीक झाला. त्यानंतर आता त्याने भारतातील नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.

अब्दूने अगदी लहान वयातच गिशदारवाच्या रस्त्यावर गायक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 2019 मध्ये त्याचं नशिब उजडलं. कारण गिशदारवाच्या रस्त्यावर गात असताना प्रसिद्ध ताजिक ब्लॉगर-रॅपर बॅरन यांची नजर अचानक अब्दूवर पडली आणि त्याचं भाग्य बदललं.

अब्दूच्या लहानपणी रस्त्यावर गातानाचे फोटो (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

रॅपर बॅरन यांनी अब्दूच्या वडिलांची भेट घेतली. अब्दूचा आवाज खूप छान आहे. त्याच्याकडे गायनाची कला आहे. त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अब्दू याला आपल्यासोबत दुबईला पाठवा, अशी विनंती रॅपर बॅरन यांनी अब्दूच्या वडिलांनी केली. अब्दूची घरची परिस्थिती खूप गरिबीची. अब्दूच्या वडिलांनी रॅपर बॅरन यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला दुबईत घेऊन जाण्याची परवानगी दिली.

बॅरनच्या मदतीने आणि सहकार्याने अब्दू दुबईला राहायला आला. सुरुवातीला बॅरन अब्दूला आर्थिक मदत करायचा. हळूहळू बॅरनने अब्दूला गायन शिकवलं. अब्दूने ताजिक भाषेत गाणी गायली. विशेष म्हणजे त्याची गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आणि तो अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला लाखो नागरिकांनी प्रेम दिलं. त्याचा यशाचा आलेख वाढतच राहत आलाय. त्याला रॅपर बॅरनच्या मदतीने एक संधी मिळाली आणि नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

अब्दूच्या कुटुंबाविषयी माहिती

अब्दूच्या वडिलांचे नाव सावरीकुल मुहम्मद आणि आईचे नाव रूह अफजा आहे. त्याचे पालक बगिचा सांभाळणारे माळी आहेत. अब्दू रोजिक याला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.

अब्दूच्या वडिलांचा फोटो (फोटो क्रेेडिट : सोशल मीडिया)

अब्दूला बालपणात मुडदूस, ग्रोथ हार्मोनची कमतरता आढळून आली होती. त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला त्याच्या आजारासाठी योग्य वैद्यकीय उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे त्याची शारीरिक वाढ खुंटली. पण आपल्याला असलेल्या शारीरिक व्याधीचा आपल्या मनावर खरंच काही फरक पडला का? यावर अब्दूने एका मुलाखतीत खूप छान उत्तर दिलं होतं.

“खरंच नाही. मी अनेक लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे नोकरी नाही, चांगले कुटुंब नाही आणि पैसा नाही. मला संघर्ष करावा लागला, पण मी आता जिथे पोहोचलो आहे त्याबद्दल मी आनंदी आहे. मी जगातील सर्वात मोठे संगीतकार ए आर रहमान यांच्यासोबत मंच शेअर केलाय; मला माझ्या करिअरमध्ये आणखी काय हवंय? मला माझ्यासारखी स्थिती असलेल्या मित्रांना प्रेरणा द्यायची आहे. माझा विश्वास आहे की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे खास असतोच”, असं अब्दूने उत्तर दिलं होतं.

अब्दूने 2019 मध्ये ‘ओही दिली जोर’, 2020 मध्ये ‘चकी चकी बोरॉन’, आणि 2021 मध्ये ‘मोदर’ (2021) सारख्या विविध ताजिकिस्तानी गाण्यांना आवाज दिलाय.

अब्दूने गाणं कसं शिकलं?

एका मुलाखतीत त्याने गाणे कसे सुरू केले हे सांगितलं होतं. “मी कॅसेटवर ऐकून गाणी शिकलो. मी जेव्हा-जेव्हा तणावात होतो तेव्हा मी स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी गुणगुणत असे आणि गाणे म्हणत असे. कालांतराने गायनाची आवड बनली. मी खेडेगावात राहत होतो, त्यामुळे मी बाजारात गाणे म्हणायचे. माझ्या सोशल मीडिया पेजवर अजूनही ते व्हिडिओ आहेत”, असं अब्दू म्हणाला होता. तसेच “मी दुबईला गेल्यानंतरच मला नवीनतम गाण्यांबद्दल माहिती मिळाली”, अशी माहिती अब्दूने दिली होती.

अब्दु रोजिक या यूट्यूब चॅनलवर त्याची गाणी उपलब्ध आहेत. त्याच्या बहुतेक गाण्यांचे बोल त्याच्या आयुष्यात आलेल्या संघर्षांवर आधारित आहेत.

‘पैलवान’ अब्दू रोजिक

अब्दूला 2017 मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षांनी त्याला सिबियामध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिअपसच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं होतं. ब्रिटिश बॉक्सिग चॅम्पियनशिप फायटर अमिर खान यांच्याकडून अब्दूने बॉक्सिंगचे धडे गिरवले आहेत.

अब्दू रोझिकला 2021 मध्ये स्पॅनिश फुटबॉल लीग असोसिएशनच्या कार्यक्रमाचं देखील निमंत्रण होतं. याशिवाय त्याला 2022 मध्ये त्याला नंबर 10ची जर्सी मिळाली होती.

अब्दूने रेसलिंगमध्ये सहभाग घेतलाय. तो एक हुशार मल्ल (फायटर) आहे. त्याने काही खेळाडंसोबत MMA लढतींमध्येही भाग घेतलाय. त्याला 2021 मध्ये MMA फायटर हसबुल्ला याने आव्हान दिलं होतं. हसबुल्ला यालादेखील अब्दू सारखीच शारीरिक व्याधी आहे. पण तो सुद्धा जगप्रसिद्ध आहे.

फोटो क्रेडिट : अब्दूच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन साभार

अब्दू आणि हसबुल्ला यांच्या MMA सामन्याची घोषणा देखील झाली होती. , सोशल मीडियावर त्याचा प्रचार झाला, परंतु रशियन ड्वार्फ ऍथलेटिक असोसिएशनने (RDAA) त्यास मान्यता दिली नव्हती आणि ते अनैतिक असल्याचं म्हटलं होतं.

एका मुलाखतीदरम्यान हसबुल्लाला या लढ्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला, “अब्दु रोजिक? तो एक गायक. या फाईटमध्ये अर्थ नाही, गायकाशी फाईट करणे माझ्यासाठी लाजिरवाणे आहे.”

अब्दूचं हिंदी गाणं सोशल मीडियावर व्हायरल

अब्दू रोजिकने 2021 मध्ये ‘ओके जानू’ चित्रपटातील गायक अरिजित सिंगचं ‘एन्ना सोना’ हे हिंदी गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्या गाण्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.

विशेष म्हणजे त्या गाण्यामुळे त्याला 2022 मध्ये UAE च्या अबुधाबी येथे आयोजित IIFA (2022) पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं होतं.

या कार्यक्रमादरम्यान त्याने ‘1942: अ लव्ह स्टोरी’ चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे हिंदी गाणे गायलं होतं. त्याने तेव्हा हे गाणं अभिनेता सलमान खानला समर्पित केलं होतं. त्या कार्यक्रमाला सलमान खान सुद्धा उपस्थित होता. कार्यक्रमानंतर सलमान खानने त्याची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली होती.

अब्दू रोजिक आणि ए आर रहमान यांची भेट

अब्दू रोजिक त्याच्या गाण्यामुळे इतका प्रसिद्ध झाला की भारताचे दिग्गज संगीतकार ए आर रहमान यांच्यासोबत त्याची भेट झाली. विशेष म्हणजे ए आर रहमान यांचा मुलगा अमीन यांच्या लग्नाच्या निमित्ताने तो पहिल्यांदा भारत भ्रमंतीला आला होता. त्यावेळी त्याला ए आर रहमान यांच्यासोबत एकाच मंचावर गाणं गाण्याची संधी मिळाली होती.

त्यावेळी अब्दूला इतका आनंद झाला होता की आनंदाने भरुन पावलो, अशी भावना त्याची होती. आपल्या या अनुभवाबद्दल अब्दूने स्वत: एका मुलाखतीत माहिती दिली होती.

“ए आर रहमान यांचा मुलगा संगीतकार अमीन यांना मी ओळखायचो. त्यांचं काम मी पाहत होतो. त्यामुळे सुदैवाने कामानिमित्ताने माझी त्यांच्यासोबत दुबईत भेट झाली. त्यानंतर ए आर रहमान यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यावेळी मी पिआनो वाजवलं होतं”, असं अब्दूने सांगितलं होतं.

“मी ए आर रहमान यांच्यासोबत ‘मुस्ताफा मुस्तफा’ हे गाणं मंचावर गायलं. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, एका ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकारासोबत मला गाणं गाता आलं. ते त्यांच्या संगीतासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचं गाणं गाताना माझ्या मनात थोडी भीती होती. पण त्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. त्यांनी मला शाबासकी दिली. त्यांच्यासोबत मंचावर गाणं गाण्याचा क्षण हा माझ्यासाठी स्वप्नवत होता. माझ्या आवडत्या संगीतकारासोबत गाणं गाताना मिळणं स्वप्न सत्यात उतरणं असंच होतं”, असं अब्दूने रझाकने सांगितलं.

अब्दू आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिकरावर पोहोचलाय. जगभरात त्याचे चाहते आहेत. असं असताना यावेळी बिग बॉस हिंदीच्या सिझन 16 मध्ये तो स्पर्धक आहे. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याने आपल्या मनाची काय घालमेल होतेय याबाबत माहिती दिली होती.

अब्दूचं भारताशी घट्ट नातं

अब्दूचं भारतासोबतचं नातं आता कुठे सुरु झालंय. ए आर रहमान यांचा मुलगा अमीन यांच्यासोबत त्याची मैत्री झाली होती. त्यानंतर दुबईत प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यात त्याची सलमान खानसोबत भेट झाली होती.

या दरम्यान तो अमीनच्या लग्नाच्या निमित्ताने भारतात आला होता. त्यानंतर आता तो ‘हिंदी बिग बॉस’च्या निमित्ताने भारतात आला. त्याची भारतातल्या फेऱ्या आणि प्रवास वाढत जाणार आहेत. कारण सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात तो दिसणार आहे.

अब्दूने आपल्या एका मुलाखतीत चेन्नईतील आपल्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “मी इथे आलो या गोष्टीचा मला आनंद झाला. मला चेन्नई शहर खूप आवडलं. त्यांनी मला निमंत्रण दिलं याबद्दल मला खूप आनंद झाला. अनेकांनी माझ्यासोबत फोटो काढले. मी भरपूर फिरलो, मसला डोसा देखील खाल्ला”, असं अब्दूने सांगितलं होतं.

अब्दूकडे हायफाय गाड्यांचं (कार) कलेक्शन

अब्दू एकेकाळी रस्त्यावर गाणी गायचा. पण तो कर्तबगार होता. त्याच्या वागण्याबोलण्यातून, मेहनतीतून त्याने स्वत:ला सिद्ध केलंय. आता तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय असं मानायला हरकत नाही. कारण त्याचं आताचं लॅविश जगणं, काम करणं यातून ते दिसून येतं. तुम्हाला त्याच्या आताच्या राहणीमान जगण्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती मिळवू शकतात. अब्दूकडे हायफार कारचं कलेक्शन आहे. विशेष म्हणजे त्याच्या हायफाय गाड्यांवर त्याचं नाव देखील कोरलंय. अब्दूकडे रॉल्स रॉयस, दोन मर्सिडीज बेन्ज, फरारी अशा कार आहेत.

रोनाल्डोपासून सलमान खान, अनेक दिग्गजांच्या भेटी

अब्दू रोजिक इतका प्रसिद्ध झालाय की जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज व्यक्तींनी त्याची भेट घेतलीय. यामध्ये जगप्रसिद्ध फूटबॉलपटू रोनाल्डो असूद्या, क्रिकेटपटू विराट कोहली असूद्या किंवा आपला भारतातला भाईजान सलमान खान. खरंतर ही यादी खूप मोठी आहे. पण प्रत्येकाचं इथे नाव सांगणं शक्य होणार नाही.

दुबईचा ‘गोल्डन विजा’

अब्दू याला यूएई देशाच्या IFCM या कंपनीने स्पॉन्सर्ड केलंय. विशेष म्हणजे त्याला वयाच्या सतराव्या वर्षी दुबईने ‘गोल्डन विजा’ दिलाय. तो त्याच्या देशाचा पहिला व्यक्ती आहे ज्याला दुबईचा ‘गोल्डन विजा’ मिळालाय. यूएई सरकारने त्याला दुबाईचं नागरिकत्व दिलंय.

अब्दू सोशल मीडिया सुपरस्टार

अब्दू रोजिक हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लून्झर आहे. तो आतापर्यंत अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रेटींना भेटलाय. तो पिआनो वाजवण्यात चांगलाच तरबेज आहे. विशेष म्हणते तो शाकाहारी खाद्यपदार्थ खातो. मोकळ्या वेळेत त्याला स्विमिंग आणि फिरायला आवडतं.तो प्राणीप्रेमी आहे.

अब्दू रोजिकला सोशल मीडियावर जवळपास 63 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

अब्दू आणि ट्रोलिंग

अब्दूला काहीवेळा सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलंय. पण त्यावर त्याने अतिशय मार्मिक उत्तर दिलंय.

एका मुलाखतीत तो ट्रोलिंगच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं होतं. “हाताचे पाचही बोटं सारखी नसतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यांकडूनचं चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. आपल्याला या नकारात्मक कमेंट्सचा काहीच फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

18 वर्षाच्या अब्दू अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित

अब्दू याला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्नामित करण्यात आलंय. यामध्ये ‘सेलेब्रिटी इन्फ्लून्झर ऑफ इयर’ या पुरस्काराच देखील समावेश आहे. वर्ल्ड बॉक्सिंग काऊन्सिलचे अध्यक्ष Mauricio Sulaiman यांनी त्याला वर्ल्ड बॉक्सिंग काऊन्सिल बेल्ट देऊन सन्मानित केलंय.

HT brunch या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या मुखपृष्ठावर अब्दू झळकला आहे. भारतीय कॉमेडियन JustSul यांच्यासोबत त्याचा फोटो HT brunch या मॅगझिनवर झळकला आहे.

अब्दूचं एक प्रसिद्ध गाणं ऐका आणि पाहा

अब्दू हा ताजिक, फार्सी भाषा बोलू शकतो. विशेष म्हणजे तो आता रशियन भाषादेखील शिकत आहे.

अब्दूला नेमका आजार काय?

अब्दू पाच वर्षांचा असताना शाळेत जाऊ लागला होता. पण या दरम्यान एक गोष्ट त्याच्या कुटुंबियांना निदर्शनास आली. ती म्हणजे अब्दूची उंची वाढत नव्हती. त्याची शारीरिक वाढ खुंटली होती. त्यामुळे कुटुंबिय प्रचंड चिंतेत पडले होते.अब्दूने स्वत: एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली होती.

“लहान असताना बरोबरीची सर्व मुलांची उंची वाढत होती. पण माझ्या शरीरात हवे तसे बदल होत नव्हते. त्यामुळे बरोबरीचे मित्र मला चिडवायला देखील लागले होते”, असं अब्दूने सांगितलं होतं.

खरंतर अब्दूला लहानपणात हार्मोन्समध्ये कमी आणि रिकेट्स या आजाराची लागण झाली होती. त्यामुळेच अब्दूची उंची ३ फूट १ इंच इतकी आहे.

रिकेस्ट म्हणजे नेमकं काय ?

रिकेट्स हा आजार साधारपणे लहान मुलांना होणारा आजार आहे. या आजारामुळे हाडं ठिसूळ होतात आणि कमजोरी जाणवते. शरीरात डी जीवनसत्वाच्या अभावामुळे या आजाराची लागण होते.

BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.