“वडिलांना मध्ये आणू नका..”; अभिषेक चिडून शोमधून निघून गेला अन्..
रितेश देशमुखच्या शोदरम्यान एका कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अशी मस्करी केली, जी पाहून अभिषेकचा राग अनावर झाला. संबंधित कॉमेडियनला सुनावत त्याने शो मध्येच सोडला.
अभिनेता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक रागारागात एका कॉमेडी शोमधून बाहेर जाताना दिसतोय. वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एका कॉमेडियनने केलेली मस्करी न आवडल्याने अभिषेक चिडून तिथून निघून जातो. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. मात्र या घटनेत एक ट्विस्टसुद्धा पहायला मिळतोय. अभिषेकने रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता है’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी वरुण शर्मा आणि कुशा कपिलासुद्धा शोमध्ये अभिषेकसोबत पाहुणे म्हणून पोहोचले होते.
या शोमध्ये कॉमेडियन पारितोष त्रिपाठीने एका ट्रोलरची भूमिका साकारली, जे नेहमी सेलिब्रिटींची खिल्ली उडवतात. पारितोषने यावेळी अमिताभ बच्चन यांच्या लांब हातांवरून एक विनोद केला आणि हा विनोद अभिषेकला अजिबात आवडला नाही. अभिषेकने शोदरम्यानच पारितोषवर नाराजी व्यक्त केली आणि त्याला इशारा दिला की वडिलांबद्दल असे विनोद तो खपवून घेणार नाही. “मला कॉमेडी समजते. मात्र तू माझ्या आई-वडिलांबद्दल काही बोलायला नको होतं. मला हे अजिबात आवडलं नाही. किमान तुम्ही त्यांच्या वयाचा तरी विचार करा. कॉमेडीची एक मर्यादा असते. ती मर्यादा न ओलांडलेलीच चांगली”, अशा शब्दांत तो कॉमेडियन पारितोषला सुनावतो.
अभिषेकला राग इतका अनावर होतो की तो मध्ये शो सोडून तिथून जाण्याचा निर्णय घेतो. मंचावरून तो तावातावाने उठून निघून जातो. हे पाहून रितेश आणि पारितोष यांच्यासह उपस्थित सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसतो. पारितोष अभिषेकला समजावण्याचा प्रयत्न करतो की त्याला कोणाचंही मन दुखवायचं नव्हतं. मात्र तरीही अभिषेक तिथून निघून जातो. अखेर काही सेकंदांनी तो पुन्हा सेटवर येतो आणि हसत सगळ्यांना सांगतो की, “हा एक प्रँक होता.” यानंतर पारितोष आणि रितेश सुटकेचा नि:श्वास सोडतात. अभिषेक घाबरलेल्या पारितोषला मिठी मारत म्हणतो, “या ट्रोलिंग गेममध्ये आता मी तुझा बॉस आहे. हे असंच असतं.”
याच शोमध्ये रितेशने अभिषेकला दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दलही प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकताच अभिषेक गालातल्या गालात हसू लागतो. तरीही हास्यावर नियंत्रण आणून तो रितेशला म्हणतो, “वयाचा विचार कर जरा, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.” हे ऐकल्यानंतर रितेश लगेचच अभिषेकच्या पाया पडू लागतो. या दोघांमधील हा मजेशीर संवादही सध्या चांगलाच चर्चेत आहे.