Sonu Sood : सोनू सूदचा दानशूरपणा ! अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी पुढे केला मदतीचा हात
अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा समाजसेवेसाठी हात पुढे केला आहे. सोनू सूदच्या नावाने बिहारमधील इंजिनिअर, अनाथ मुलांसाठी शाळा चालवतो. आता सोनू सूद त्याचा खर्च उचलणार आहे.
Sonu Sood Social Service : कोरोना महामारीच्या भीषण काळात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) समाजसेवेत (Social Service) खूप सक्रिय झाला होता. सोनू सूद गरीब लोकांच्या मदतीसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतो. आता सोनूची बिहारमधील एका अभियंत्याशी भेट झाली आहे, जो नोकरी सोडून कटिहारमध्ये सोनू सूदच्या नावाने अनाथ मुलांसाठी (school for orphan children) शाळा चालवतो. सोनू सूद आता या मुलांच्या शिक्षणाचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च उचलणार आहे.
सोनू सूदने 27 वर्षीय अभियंता बिरेंद्र कुमार महतो यांची भेट घेतली. बिरेंद्रने नोकरी सोडून अनाथ मुलांसाठी शाळा उघडली आहे. विशेष म्हणजे या शाळेला अभिनेत्याच्या नावावरून ‘सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल’ असे नाव देण्यात आले आहे. आता सोनू सूद या उदात्त कार्यात बिरेंद्रला मदत करणार आहे. सोनू सूदने शाळेची मोठी इमारत आणि मुलांच्या शिक्षणासाठी चांगली व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे.
View this post on Instagram
सोनू सूदने बिरेंद्र कुमार आणि शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्याचे फोटोही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, ‘बिहारमधील अनाथ मुलांना चांगले शिक्षण आणि अन्न पुरवणाऱ्या बिरेंद्र महतो यांच्या या उदात्त कार्याशी जोडला गेल्याने मला खूप आनंद होत आहे. सोनू सूद इंटरनॅशनल स्कूलशी संलग्न होऊन, मुलांना चांगले शिक्षण, इमारत आणि भोजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल’.
सोनू सूद मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात खूप योगदान देत आहे. सोनू सूद देशभरातील सुमारे 10 हजार मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असल्याचे वृत्त आहे. तसेच सोनू देशातील तरुण कलागुणांना वाव देण्यासही मदत करतो. सोनू सूदने कोरोनामध्ये अडकलेल्या प्रवाशांना घरी पोहोचवण्यापासून पीडितांना मदत करण्यापर्यंत अनेक उदात्त काम केले आहे. सोनू सूद सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.