Adipurush | सीताहरण करताना रावणाने स्पर्श का केला नाही? ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरवरील वादावर लेखकाचं उत्तर
'आदिपुरुष'चा नवीन ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये रावणाने सीतेला स्पर्श न करताच तिचं हरण केलं होतं. यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली. आता आदिपुरुषच्या लेखकाने यावर मौन सोडलं आहे.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रामायणाची कथा नव्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने या चित्रपटात राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने लक्ष्मण, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रेक्षकांनी कलाकारांच्या लूकवरून आणि व्हिएफएक्सवरून टीका केल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात आवश्यक तो बदल केला. मात्र आता पुन्हा एकदा आदिपुरुषमधील एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे. हा सीन आहे सीताहरणचा.
चित्रपटात दाखवलेल्या सीताहरण सीनमागील सत्य
‘आदिपुरुष’चा नवीन ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये रावणाने सीतेला स्पर्श न करताच तिचं हरण केलं होतं. यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली. आता आदिपुरुषच्या लेखकाने यावर मौन सोडलं आहे. प्रेक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर लेखक मनोज मुंतशीर यांनी दिलं आहे.
काय म्हणाले मनोज मुंतशीर?
आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी सीताहरणच्या सीनबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. रावणाने सीतेला स्पर्श का केला नाही यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “सीतेच्या आधी रावणाने त्याची सून रंभाला आपल्या वासनेचा शिकार केला होता. त्यानंतर रंभाने रावणाला शाप दिला होता की जर त्याने कोणत्याही महिलेला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला, तर त्याच्या शिराचे तुकडे-तुकडे होतील. याच कारणामुळे रावणाने सीतेला स्पर्श न करता हरण केलं होतं.”
गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.