Adipurush | ‘जलेगी भी तेरे बाप की’; ‘आदिपुरुष’मध्ये असे डायलॉग का लिहिले? अखेर लेखकाने सोडलं मौन
'आदिपुरुष' या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती, अखेर तो ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. त्यातील डायलॉग्सवरून सोशल मीडियावर हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत. त्यावर आता चित्रपटाचे सहलेखक मनोज मुंतशीर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना या डायलॉग्सवरून प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्हा जाणूनबुजून असे डायलॉग्स लिहिले आहेत का”, असं विचारलं असता त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे डायलॉग्स का लिहिले, याचंही उत्तर त्यांनी दिलं.
“जाणूनबुजून असे डायलॉग लिहिले”
चित्रपटातील काही संवादांवरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जातेय. त्यातही बजरंग बलीच्या तोंडी असलेला एक डायलॉग मोठ्या प्रमाणात ट्रोल केला जातोय. “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की”, असा हा डायलॉग आहे. हा संवाद लिहिताना काही चूक झाली का, असं विचारलं असता मनोज मुंतशीर म्हणाले, “ही चूक नाही. अत्यंत सूक्ष्म विचारप्रक्रियेतनंतरच बजरंग बली आणि सर्व पात्रांसाठी डायलॉग लिहिण्यात आले आहेत. आम्ही जाणूनबुजून ते डायलॉग सोप्या भाषेत लिहिले आहेत. कारण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जर चित्रपटात अनेक पात्रं असतील तर प्रत्येकाची भाषा एकाच प्रकारची असू शकत नाही. प्रत्येक पात्राच्या भाषेत विविधता आणावी लागते.”
“असे डायलॉग लिहिणारा मी पहिलाच नाही”
“आपल्याकडे जेव्हा आजी रामायणाची कथा सांगायची, तेव्हा त्या अशाच भाषेत सांगायच्या. ज्या डायलॉगचा तुम्ही उल्लेख केला, या देशाचे संत, मोठमोठे कथावाचक अशाच भाषेत बोलतात. अशा पद्धतीचे डायलॉग लिहिणारी मी पहिलीच व्यक्ती नाही. असे संवाद आधीपासूनच आपल्याकडे आहेत”, असं ते पुढे म्हणाले.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.