‘अजूनही काही गोष्टी समजायच्या बाकी..’; 2024 हे वर्ष संपताना मलायकाच्या पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेत्री मलायका अरोराने वर्षाच्या अखेरीस एक पोस्ट लिहित नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. 2024 हे वर्ष खूप कठीण आणि आव्हानात्मक असल्याचं तिने यात म्हटलंय. याच वर्षी मलायकाने तिच्या वडिलांना गमावलंय. तर अर्जुन कपूरसोबतही तिचं ब्रेकअप झालंय.
2024 हे वर्ष संपत असताना अनेकजण या वर्षातील चांगल्या आणि वाईट आठवणींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री मलायका अरोरानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 2024 हे वर्ष कसं होतं, हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे. या वर्षभरातील विविध अनुभवांमधून तिला काय शिकायला मिळालं, याविषयी तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. ‘2024 हे वर्ष स्वत:ला शोधण्याचं आणि अधिक सक्षम करण्याचं वर्ष होतं. या वर्षाने मला स्वत:च्या सामर्थ्याकडे झुकण्यास आणि स्वत:च्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवण्यास शिकवलं’, असं तिने म्हटलंय.
मलायकाची पोस्ट-
‘2024… मी तुझा द्वेष करत नाही. पण तू खूप कठीण, आव्हानात्मक, बदलांचा आणि शिकवणीचा वर्ष होतास. आयुष्य एका क्षणात बदलू शकतं आणि स्वत:वर अधिक विश्वास ठेवणं गरजेचं असतं हे तू मला दाखवलंस. पण या सर्वांपेक्षा माझं शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचं असल्याचं तू मला समजावलंस. अशा काही गोष्टी आहेत ज्या मला अजूनही समजू शकत नाहीत, परंतु मला विश्वास आहे की वेळेनुसार मला घडलेल्या प्रत्येक गोष्टीची कारणं आणि हेतू समजतील’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.
2024 या वर्षांत मलायकाच्या आयुष्यात दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. मलायकाने यावर्षी तिचे वडील अनिल अरोरा यांना गमावलं. तर सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने अभिनेता अर्जुन कपूरशीही ब्रेकअप केलं. 11 सप्टेंबर रोजी मलायकाचे वडील अनिल अरोरा हे त्यांच्या वांद्रे इथल्या राहत्या इमारतीखाली मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याआधी काही दिवसांपासून मलायकाच्या ब्रेकअपच्याही चर्चा होत्या.
दिवाळीत एका कार्यक्रमात खुद्द अर्जुनने सर्वांसमोर ‘सिंगल’ असल्याचं जाहीर केलं होतं. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला अर्जुन कपूर आणि ‘सिंघम अगेन’मधील काही कलाकार उपस्थित होते. यावेळी अर्जुन मंचावर येताच उपस्थित प्रेक्षक ‘मलायका.. मलायका’ अशा घोषणा करू लागले. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, “नाही, आता मी सिंगल आहे. शांत राहा.” त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मलायका आणि अर्जुन हे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. ब्रेकअपनंतर काही दिवसांनी मलायकाने तिच्या वडिलांना गमावलं होतं. या कठीण काळात अर्जुनने तिची साथ दिली होती.