Gadar 2 | ‘हे फक्त भैय्याच करू शकतात’; सनी देओलबद्दल सावत्र बहीण ईशा असं का म्हणाली?
‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती.
मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचा यश संपूर्ण इंडस्ट्रीत साजरा केला जातोय. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांनीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं. त्यानंतर आता ईशा देओलनेही ‘गदर 2’च्या धडाकेबाज यशावर आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच ईशाने खास भाऊ सनी देओलसाठी ‘गदर 2’च्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी बऱ्याच वर्षांनंतर तिघे भावंडं एकत्र दिसले होते. ईशाने सनी देओल आणि बॉबी देओलसोबत फोटोसुद्धा क्लिक केले.
“मला माहीत होतं की भैय्याने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली होती आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे आता जेव्हा चित्रपट चांगली कमाई करतोय, तर आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी खूप खुश आहोत. या यशावर त्यांचा पूर्ण हक्क आहे. गदर 2 मध्ये तारा सिंगने जे काही केलं, ते फक्त भैय्याच (सनी देओल) करू शकतात”, अशा शब्दांत ईशा व्यक्त झाली होती. ईशा ही सनी आणि बॉबी देओलची सावत्र बहीण आहे. ती धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे.
आता हेमा मालिनी या चित्रपटाविषयी म्हणाल्या, “लोक सनीवर खूप जास्त प्रेम करतात. त्यांना त्याला पडद्यावर पहायचं होतं. मी त्याला नेहमी म्हणायचे की तुला आता तुझा बेस्ट चित्रपट करायची गरज आहे. तुला करावंच लागेल. तो म्हणायचा की हो, हो. मी करेन. तो खूपच चांगल्या स्वभावाचा आहे. त्याने अखेर हा चित्रपट केल्याने मी फार खुश आहे. सर्व स्तरांतून त्याचं कौतुक होतं. या चित्रपटातील प्रत्येक सीन खूप चांगला होता. लोकांकडून खूप प्रेम मिळतंय.”
‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 425 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेलसोबत उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनिष वाधवा आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनल्याचा खुलासा अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत केला.