‘व्हॅलेंटाइन डे’ची अशी पोस्ट.. अजय-काजोलच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा
व्हॅलेंटाइन डेनिमित्त अजय देवगण आणि काजोलच्या पोस्ट पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांच्या नात्यात काहीतरी आलबेल नाही, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. काजोलच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता अजय देवगण आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 1995 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. 24 फेब्रुवारी 1999 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. अजय आणि काजोलला निसा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. ही जोडी आजसुद्धा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. एकमेकांच्या विरोधी स्वभावाचे अजय आणि काजोल नेहमीच एकमेकांविषयी अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त करताना दिसतात. मात्र यंदाच्या व्हॅलेंटाइन डेला काहीतरी वेगळंच चित्र पहायला मिळालं. त्यामुळे सोशल मीडियावर अजय आणि काजोलच्या नात्याविषयी चर्चांना उधाण आलंय.
14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे सोशल मीडियावर आपापल्या जोडीदाराविषयी अनेकांनी रोमँटिक पोस्ट लिहिल्या होत्या. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी अजय देवगणने काजोलसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘माझं हृदय मी कोणासोबत शेअर करावं हे खूप लवकरच ठरवलं होतं आणि आजपर्यंत ती गोष्ट तशीच आहे. माझी आजची आणि रोजची व्हॅलेंटाइन.. काजोल.’ अजयने सोशल मीडियावर काजोलसाठी इतकी प्रेमळ पोस्ट लिहिली होती. मात्र काजोलची पोस्ट याउलटच दिसली. तिने सोशल मीडियावर फक्त स्वत:चा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘मला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा. लव्ह यू.’ यासोबतच तिने ‘सेल्फ लव्ह’ म्हणजेच स्वत:वरील प्रेमाबाबतचे हॅशटॅग जोडले.




View this post on Instagram
या दोघांच्या व्हॅलेंटाइन पोस्टमधील फरक पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. ‘या दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘अजयने काजोलला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या, तर काजोलने स्वत:लाच व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हल्ली लग्न खूपच भयानक गोष्ट होऊ लागली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘कदाचित तो तिला सतत दुर्लक्ष करत असेल, म्हणून तिने रागात अशी पोस्ट लिहिली असेल’, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
अजय देवगणच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तो नुकताच अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘आझाद’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून अजयचा पुतणा अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जानेवारी महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर तो दणक्यात आपटला. तर दुसरीकडे काजोल ‘दो पत्ती’ या थ्रिलर चित्रपटात झळकली होती. यामध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातून प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.