सुपरस्टार अजित कुमार रुग्णालयात, मॅनेजरने दिली हेल्थ अपडेट; ब्रेन सर्जरीच्या चर्चांवरही सोडलं मौन
'थाला' म्हणून ओळखला जाणारा साऊथ सुपरस्टार अजित कुमारला चेन्नईमधल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्याच्या प्रकृतीविषयी मॅनेजरने अपडेट दिली आहे. त्यासोबतच अजितवर ब्रेन सर्जरी झाल्याच्या चर्चांवरही मौन सोडलं आहे.

चेन्नई : 9 मार्च 2024 | तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमारला चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल केलंय. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर त्याच्या असंख्य चाहत्यांनी प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. अजितवर ब्रेन सर्जरी झाल्याचाही दावा काहींनी केला. मात्र आता अजितच्या मॅनेजरने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. अजित हा आरोग्याच्या नियमित चाचण्यांसाठी रुग्णालयात गेल्याचं मॅनेजरने स्पष्ट केलं. त्याचसोबत त्याने ब्रेन ट्युमर आणि ब्रेन सर्जरीच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे.
अजित कुमारचा मॅनेजर सुरेश चंद्राने सांगितलं, “ब्रेन ट्युमरच्या बातमीत काही तथ्य नाही. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. तपासादरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास आलं की त्यांच्या कानाच्या खाली असलेल्या शिरा कमकुवत झाल्या आहेत. त्यावर अर्ध्या तासात त्यांनी उपचार पूर्ण केले. अजित कुमार यांना आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. शनिवारी सकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.”
अजित कुमारचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणारे अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मॅनेजरने दिलेल्या अपडेटनंतर त्याच्या ब्रेन सर्जरीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अजित गेल्या काही दिवसांपासून मगिज थिरुमेनीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘विदा मुयारची’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. आत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा शूटिंगसाठी परतणार असल्याचं कळतंय.




अजित कुमारने नुकताच त्याच्या मुलाचा नववा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अजितच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ‘विदा मुयारची’ या चित्रपटात अजितसोबत अभिनेत्री तृषा मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची 90 टक्के शूटिंग पूर्ण झाली आहे.
अजित कुमार हा अभिनेत्यासोबतच कार रेसरसुद्धा आहे. त्याने अनेक तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. चेन्नई, तामिळनाडू इथं लहानाचा मोठा झाल्याने त्याचं तमिळ संस्कृती आणि समाजाशी घट्ट नातं आहे. 1986 मध्ये आसन मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून त्याने शिक्षण घेतलं. त्यानंतर तो टू-फोर व्हीलर मेकॅनिक बनला. मात्र हाच मेकॅनिक पुढे जाऊन दमदार अभिनेता बनला.