वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचं मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतत चाललं आहे. एकीकडे आकांक्षाने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून आकांक्षाच्या वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आकांक्षाच्या वकिलांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्याचवेळी तिच्या मृत्यूच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं, याविषयी नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री आकांक्षाने ब्रेकअप पार्टी केली होती, असं म्हटलं जात आहे. आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी पबमध्ये पार्टी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वकील शशांक त्रिपाठी यांनी सांगितलं.
आकांक्षा तिच्या तीन मैत्रिणींसोबत पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी 11 हजार रुपयांचं बिलसुद्धा तिने भरलं होतं. त्या पबमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये आकांक्षासुद्धा दिसून येत आहे. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्या पोटात अन्नच सापडलं नव्हतं. आकांक्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तिच्या ब्रेकअप पार्टीवरही प्रश्न उपस्थित करत आहे. या ब्रेकअप पार्टीत तिने स्वत: काहीच खाल्लं नव्हतं आणि कोणतीही नशा केली नव्हती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या पोटात तपकिरी रंगाचा पदार्थ आढळला होता.
26 मार्च रोजी आकांक्षा वाराणसीच्या सारनाथ भागातील एका हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र आकांक्षा आईने समर आणि त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती. आकांक्षाच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला वाराणसी पोलिसांनी गाझियाबाद इथून अटक केली. समरवर आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
आकांक्षा दुबे आणि समर सिंह हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असं म्हटलं जात आहे. समरच्या अटकेनंतर आता पोलीस त्याचा भाऊ संजयचा शोध घेत आहेत. वाराणसीहून आलेल्या पोलिसांच्या एका पथकाने मध्यरात्री 12 वाजता समरला अटक केल्याची माहिती गाझियाबादच्या एसपींनी दिली. अटकेपासून वाचण्यासाठी समर सिंह हा नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये लपून बसला होता. त्याच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकांक्षाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट जाही केला होता, त्यात त्यांनी क्लिन चिट दिली होती. यात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसून तिने आत्महत्याच केली, असं डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र आकांक्षाच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या वकिलांनी या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “आकांक्षाच्या पोटातून जेवण किंवा द्रव पदार्थ मिळाले नाही. मात्र तिच्या पोटात तपकिरी रंगाचा पदार्थ आढळला होता. त्याबद्दल काहीच का सांगितलं गेलं नाही? या 20 एमएल पदार्थाच्या बाबतीत काहीच का बोललं जात नाहीये?”, असा सवाल वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी केला होता.