सलमानच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला..
अभिनेता अक्षय कुमारला सलमानच्या चित्रपटांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. सलमानचे चित्रपट सतत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत असल्याने त्याचं स्टारडम कमी झालंय का, असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिलं..

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळत नसल्याने त्याची जादू ओसरली की काय, असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. ‘टायगर 3’, ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘सिकंदर’ यांसारख्या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावर आता अभिनेता अक्षय कुमारने खास प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय दिल्लीत त्याच्या ‘केसरी: चाप्टर 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी पोहोचला होता. स्क्रिनिंगनंतर थिएटरमधून बाहेर पडताना एका पत्रकाराने त्याला सलमानबद्दल प्रश्न विचारला. सलमानचा ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही, याआधीचे चित्रपटही फ्लॉप ठरले, यावर तुझं काय मत आहे, अशा सवाल अक्षयला करण्यात आला.
पत्रकाराच्या प्रश्नावर अक्षय म्हणाला, “टायगर जिंदा है और हमेशा जिंदा रहेगा (वाघ जिवंत आहे आणि नेहमीच जिवंत राहील). सलमान एका अशा प्रजातीचा वाघ आहे जो आयुष्यात कधी मरू शकत नाही. तो नेहमीच तिथे असेल.” अक्षय कुमारची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याबद्दल सलमानचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.




एकीकडे सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करत नसताना दुसरीकडे त्याच्या वयावरूनही काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘सिकंदर’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यानचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातील त्याच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंग केलं होतं. ‘टायगर आता म्हातारा झालाय’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. त्यावर सलमाननेही सडेतोड उत्तर दिलं. इन्स्टाग्रामवर जिममधील वर्कआऊटचे फोटो पोस्ट करत त्याने वय आणि दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांची बोलतीच बंद केली. या फोटोंमध्ये सलमानचं फिटनेस स्पष्ट पहायला मिळत होतं. ‘प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद..’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले होते.
View this post on Instagram
सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 17 दिवसांत जगभरात फक्त 183 कोटी रुपयांची कमाई केली. प्रॉडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. परंतु तरीही सलमानच्या स्टारडमच्या तुलनेत ही कमाई फारच कमी आहे.