OMG 2 | रेल्वेच्या पाण्याने शंकरावर अभिषेक; अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’बद्दल सेन्सॉर बोर्डाचं सावध पाऊल
'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं असून यामध्ये अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत आहे. अक्षयसोबतच यामध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाकडून आता विशेष काळजी घेतली जात आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्याआधी हा चित्रपट सुधारित समितीकडे पाठवला आहे. यातील संवाद आणि सीन्सवरून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये म्हणून आधीच त्याविषयी काळजी घेतली जात आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून झालेल्या वादाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्डाने यावेळी हा चित्रपट सुधारित समितीकडे पाठवला आहे. इतकंच नव्हे तर देव किंवा धर्म या विषयांशी संबंधित चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाकडून प्रत्येक वेळी रिव्ह्यू आणि रिव्हिजनसाठी पाठवले जाणार असल्याचं कळतंय.
प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला बऱ्याच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डालाही सुनावलं होतं. सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला प्रमाणपत्र दिलंच कसं, असा सवाल कोर्टाने केला होता. म्हणूनच आता ‘OMG 2’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी बोर्डाकडून पूर्वकाळजी घेतली जात आहे. ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातील कोणते संवाद आणि सीन्स सेन्सॉर बोर्डाला खटकले आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.
View this post on Instagram
‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं असून यामध्ये अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत आहे. अक्षयसोबतच यामध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मात्र सीक्वेलची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचं कळतंय.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. अनेकांनी त्याच्या लूकविषयी आणि चित्रपटाच्या कथेविषयी कुतूहल व्यक्त केलं आहे. तर काहींनी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत अशी अपेक्षा केली आहे. ‘या चित्रपटात सनातन धर्माची मस्करी होऊ नये’, असं एकाने लिहिलं. तर ‘अपेक्षा हीच आहे की सनातन धर्माचा आदर केला जावा’ असं दुसऱ्याने म्हटलंय.