अंबानींच्या फंक्शनमध्ये नाचण्यासाठी अक्षय कुमारला करावी लागली ‘ही’ तडजोड
जामनगरमध्ये तीन दिवस पार पडलेल्या अंबानींच्या कार्यक्रमाला अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अभिनेता अक्षय कुमारनेही जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. मात्र त्यासाठी अक्षयला एका गोष्टीबाबत तडजोड करावी लागली.
मुंबई : 8 मार्च 2024 | अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. अक्षयचं दिवसभरातील रुटीन ठरलेलं असतं आणि त्याचं तो तंतोतंत पालन करतो. शूटिंगदरम्यानही त्याची जेवण्याची आणि झोपण्याची वेळ ठरलेली असते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या दिग्दर्शकांना, निर्मात्यांना ही गोष्ट माहीत असल्याने त्याच्या वेळा न चुकता पाळल्या जातात. मात्र अंबानींच्या कार्यक्रमासाठी अक्षयने त्याच्या याच सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तडजोड केली होती. मुकेश आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अंबानी अंबानीचा प्री-वेडिंग कार्यक्रम अत्यंत धूमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अक्षयने अंबानीच्या या कार्यक्रमात डान्स परफॉर्म केला होता.
जामनगरमध्ये पार पडलेल्या या प्री-वेडिंगसाठी अंबानींनी अमाप पैसा खर्च केला होता. तीन दिवसांपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता आणि एके दिवशी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत हा फंक्शन लांबत गेला होता. अक्षयला रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठायची सवय आहे. कोणत्याही परिस्थितीत तो या रुटीनमध्ये बदल करत नाही. मात्र अंबानींच्या कार्यक्रमात त्याला मध्यरात्री 3 वाजेपर्यंत जागं राहावं लागलं होतं.
View this post on Instagram
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “माझा परफॉर्मन्स मध्यरात्री 3 वाजता होता. अर्थातच हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भव्य स्वरुपाचा होता. पण त्याव्यतिरिक्त अंबानी कुटुंबीय खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे होते. प्रत्येकाला त्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. अनंत आणि राधिका यांनी खूप चांगल्याप्रकारे पाहुणाचार केला. त्या दोघांना महाकालकडून आशीर्वाद मिळो.” अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अक्षय कुमारने जबरदस्त डान्स केला होता.
अक्षयच्या नेहमीच्या रुटीननुसार तो पहाटे 4 वाजता उठतो आणि उठल्यानंतरचा त्याचा दिनक्रमही ठरलेला असतो. एका मुलाखतीत खुद्द त्यानेच रुटीन सांगितला होता. “माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 किंवा साडेचार वाजताच होते. मी रात्री 9 ते साडेनऊ वाजेपर्यंत झोपतो”, असं तो म्हणाला होता. अंबानींच्या कार्यक्रमात फक्त अक्षयच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनीसुद्धा डान्स केला होता. यावेळी साऊथ सुपरस्टार रामचरणनेसुद्धा त्यांच्यासोबत ठेका धरला होता. फक्त बॉलिवूडच नव्हे तर परदेशातील दिग्गजसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप सिंगर रिहानाने या कार्यक्रमात लाइव्ह परफॉर्म केलं होतं.