AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दहशतवाद्यांना एकच बोलायचंय..” असं अक्षय कुमारने म्हणताच थिएटरमध्ये एकच आवाज

'केसरी चाप्टर 2' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर अक्षय कुमारने थिएटरमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर वक्तव्य केलं. दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगायची आहे.. असं अक्षयने म्हणताच थिएटरमध्ये एकचा आवाज झाला.

दहशतवाद्यांना एकच बोलायचंय.. असं अक्षय कुमारने म्हणताच थिएटरमध्ये एकच आवाज
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 10:49 AM

‘केसरी चाप्टर 2’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला शनिवारी अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली होती. यावेळी त्याच्यासोबत सहअभिनेता आर. माधवनसुद्धा उपस्थित होता. चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडल्यानंतर अक्षय कुमारने प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्याने जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्यावर वक्तव्य केलं. या घटनेमुळे ‘केसरी 2’मध्ये मी साकारलेल्या पात्राला जसा राग आला होता, तोच राग पुन्हा एकदा मनात निर्माण झाल्याचं अक्षयने सांगितलं. चाहत्यांशी बोलतानाचा अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“दुर्दैवाने आज आपल्या सर्वांच्या मनात तोच राग पुन्हा निर्माण झाला आहे. तुम्हा सर्वांना खूप चांगल्याप्रकारे माहीत आहे की मी कशाबद्दल बोलतोय? आजसुद्धा आपल्याला त्या दहशतवाद्यांना एकच गोष्ट बोलायची आहे, जे मी या चित्रपटात म्हणालोय, काय…” असं अक्षयने विचारताच थिएटरमध्ये प्रेक्षक एकच आवाज करतात. चित्रपटातील अक्षय कुमारचा ‘F*** You’ हा डायलॉग सर्व प्रेक्षक म्हणू लागतात.

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामपासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसनर पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यापैकी चार ते पाच जण हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आले असण्याची शक्यता आहे. शिवाय हल्लेखोरांच्या शरीरांवर कॅमेरे लावण्यात आल्याची शंकाही जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यामागील मुख्य हेतू अमरनाथ यात्रेपूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये दहशत निर्माणकरण्याचा होता. या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ असल्याचा संशय आहे. ‘रेझिस्टन्स फ्रंट’चे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ असे हल्ले करण्यात तज्ज्ञ आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांपैकी काहीजण हे पाकिस्तानमध्ये बोलल्या जाणाऱ्या शैलीत उर्दू बोलत होते.