‘चेहऱ्याला पक्षाघात, बोटॉक्स चुकलं’ म्हणणाऱ्यांना आलिया भट्टने चांगलंच सुनावलं
तुझा बोटॉक्स चुकीचा झाला, चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाला, तू विचित्र बोलतेस, विचित्र हसतेस.. अशा टीका करणाऱ्यांना अभिनेत्री आलिया भट्टने चांगलंच सुनावलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. मात्र या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आलेल्या कमेंट्सबद्दल तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आलियाने कॉस्मेटिक सर्जरी केली, तिचा बोटॉक्स चुकीचा झाला, इतकंच नव्हे तर तिच्या चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. हे सर्व कमेंट्स वाचून संतापलेल्या आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.
आलियाची पोस्ट-
‘जे लोक कॉस्मेटिक करेक्शन्स किंवा सर्जरी करतात, त्यांच्याबद्दल मी कोणतंच मत बनवत नाहीये. तुमचं शरीर, तुमचा निर्णय. पण सोशल मीडियावर जे सर्रास व्हिडीओ व्हायरल करून माझ्याबद्दल खोटे दावे केले जात आहेत की माझं बोटॉक्स चुकीचं झालंय, माझं हसणं थोडं वाकडं आहे, मी विचित्रपणे बोलते.. हे सर्व हसण्याच्याही पलीकडचं आहे. मानवी चेहऱ्याबद्दल तुम्ही ही जी मतं बनवत आहात की अत्यंत टोकाची आहेत आणि आता तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने वैज्ञानिक स्पष्टीकरणं देत आहात की माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाला आहे? ही मस्करी आहे का? शून्य पुरावे, कोणत्याही पुष्टीशिवाय आणि कोणत्याही आधाराशिवाय हे गंभीर दावे केले जात आहेत’, असं तिने लिहिलंय.
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही तरुण आणि प्रभावशाली मनांवर प्रभाव पाडत आहेत, ज्यांना खरंच अशा प्रकारच्या कचऱ्यावर विश्वास बसू शकतो. तुम्ही हे सगळं का करत आहात? क्लिक्स मिळवण्यासाठी? लक्ष वेधून घेण्यासाठी? कारण या सगळ्यांचा काहीच अर्थ नाही. एका मिनिटासाठी आपण इंटरनेटवर महिलांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं, त्याचं मूल्यमापन केलं जातं ते पाहुयात.. आमचे चेहरे, शरीर, खासगी आयुष्य, अगदी आम्ही अडखळलो तरी त्यावरून मतं बनवली जातात, टीका केली जाते. आपण एकमेकांचं व्यक्तिमत्त्व साजरं केलं पाहिजे, एकमेकांबद्दल टीका करून दुखावू नये. अशा प्रकारची मतं ही अवास्तव स्टँडर्ड्स दर्शवितात, ज्यामुळे लोकांना आपण कधीच पुरेसे नाही आहोत असं वाटू लागतं. हे खरंच हानिकारक आणि थकवणारं आहे.’
‘आणि यात सर्वांत दु:खदायक बाब माहितीये का? अशा प्रकारची अनेक मतं ही दुसऱ्या महिलांकडूनच मांडली जातात. जगा आणि जगू द्या, प्रत्येकाला निवडीचा अधिकार आहे.. याचं काय झालं? त्याऐवजी आपल्याला एकमेकांपासून वेगळं करण्याची इतकी सवय झाली आहे की हे जवळपास सामान्य आणि नेहमीचं वाटू लागतंय. दरम्यान इंटरनेटद्वारे बनवलेले अत्यंत मनोरंजक स्क्रिप्ट्स वाचण्यात आजचाही दिवस गेला’, अशा शब्दांत तिने टीकाकारांना सुनावलं आहे.