पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन भावूक; चेंगराचेंगरीचे व्हिडीओ पाहून..
अभिनेता अल्लू अर्जुनची मंगळवारी पोलिसांकडून तीन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचे व्हिडीओसुद्धा दाखवण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये रेवती आणि त्यांच्या मुलाची अवस्था पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला.
‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत चांगलीच वाढ केली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर गेल्या वीस दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता त्याठिकाणी आल्याने चाहत्यांची गर्दी वाढली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी त्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी झाली. यावेळी त्याला घटनेबद्दल वीसहून अधिक प्रश्न विचारले गेले. या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन भावूक झाल्याची माहिती समोर येत आहे.
अल्लू अर्जुनला पोलिसांनी दाखवले चेंगराचेंगरीचे व्हिडीओ
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीचे काही व्हिडीओ पोलिसांनी अल्लू अर्जुनला दाखवले. या व्हिडीओमध्ये रेवती आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज दुखापतग्रस्त झाल्याचं दिसताच अल्लू अर्जुन भावूक झाला. चेंगराचेंगरीदरम्यान रेवती यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा श्रीतेज गेल्या वीस दिवसांपासून अत्यवस्थ होता. तब्बल वीस दिवसांनंतर त्याने मंगळवारी प्रतिसाद दिला. श्रीतेजच्या उपचारासाठी अल्लू अर्जुन आणि तेलंगणा सरकार मदत करत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
अल्लू अर्जुनची कसून चौकशी
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल बरेच प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटाच्या टीमला संध्या थिएटरमध्ये जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती, हे तुला माहित होतं का, त्यानंतरही थिएटरला भेट देण्याचा निर्णय कोणाचा होता, पोलिसांनी तुला चेंगराचेंगरीबद्दलची माहिती दिली होती का, महिलेच्या मृत्यूबद्दल तुला कधी समजलं.. असे अनेक प्रश्न अल्लू अर्जुनला विचारले गेले. मंगळवारी सकाळी 11 नंतर अल्लू अर्जुन त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांबरोबर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याची चौकशी दुपारी 2.45 पर्यंत चालली. पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथकाने त्याची चौकशी केली.
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरसाठी 35 वर्षीय एम. रेवती या त्यांचे पती एम. भास्कर, नऊ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांच्या मुलीसोबत आल्या होत्या. रात्री 9.30 च्या सुमारास जेव्हा अल्लू अर्जुन त्याच्या सुरक्षेसह थिएटरमध्ये आला, तेव्हा त्याच्यासोबत असंख्य चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थिएटर व्यवस्थापनाकडून कोणतीच अतिरिक्त तरतूद करण्यात आली नव्हती. यावेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले. या गर्दीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला. तिथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढलं. त्यांनी रेवती यांच्या मुलावर सीपीआर करून त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.