Zombivli: बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर आता ‘झोंबिवली’ OTTवर प्रिमिअरसाठी सज्ज
हा मराठीतला पहिलाच झोंबी सिनेमा असून त्यात ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि तृप्ती खामकर मुख्य भूमिकेत आहेत. यूडली फिल्म्सची निर्मिती आणि फास्टर फेणे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेल्या झोंबिवली या सिनेमात कॉमेडी आणि सामाजिक भाष्य यांची सरमिसळ आहे.
झोंबिवली (Zombivli) हा मराठीतला पहिलाच झोंबी सिनेमा असून त्यात ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि तृप्ती खामकर मुख्य भूमिकेत आहेत. यूडली फिल्म्सची निर्मिती आणि फास्टर फेणे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेल्या झोंबिवली या सिनेमात कॉमेडी आणि सामाजिक भाष्य यांची सरमिसळ आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर समीक्षक आणि चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. आता 20 मे रोजी हा सिनेमा झी5वर (Zee5) डिजिटल प्रीमिअरकरिता सज्ज आहे. (Zombivli on OTT) ही कथा सुधीर (अमेय वाघ) या एका मध्यमवर्गीय इंजिनीअरची असून तो त्याची गर्भवती पत्नी, सीमा (वैदेही परशुरामी) सोबत डोंबिवलीतील टोलेजंग इमारतीत राहायला येतो. आपले उर्वरित आयुष्य छान जाईल ही त्याची अपेक्षा असते. तरीच सुरुवातीच्या काळात त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यानंतर लगेचच जवळच्या जनता नगर वस्तीत झोंबी उद्रेक अनुभवायला मिळतो. हे झोंबी कैकपटीत असतात. टोलेजंग इमारतीमधील लोकांचा भपका पार गळून पडतो. तिथे त्यांच्यासमोर उभे असलेले झोंबी फक्त रक्तपिपासू नसतात, ते अत्यंत हीन खलनायकी प्रवृत्तीचे टोकाचे स्वार्थी आणि अमानुष असतात.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला, “आम्ही कोविड उद्रेकानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी बराच काळ वाट पाहिली, तरीच सिनेमाला मिळालेले यश ही आमच्या मेहनतीला मिळालेली पोचपावती आहे. आम्ही एकत्र येऊन या संकल्पनेवर विश्वास ठेवला. झोंबिवली ही मराठीमधील पहिली झोंबी फिल्म आहे. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकांकडून दाद मिळाल्याने आनंद वाटतो. या जागतिक संकल्पनेला स्थानिक विषयांची फोडणी दिली आहे. ज्यांना अजूनही हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांनी तो झी5वर पाहावा”.
अभिनेता अमेय वाघ म्हणाला, “सामाजिक संदेशासोबत विनोदाची चटक दिल्याबद्दल मला आमच्या दिग्दर्शकाचा फार अभिमान वाटतो. ही एक परिपूर्ण कलाकृती आहे. झोंबिवली हा एक मजेदार सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र या सिनेमाची मजा घेता येईल आणि हास्याची कारंजी उडतील. शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला लावेल. या सिनेमाचं शूटींग करताना आम्ही खूप मजा केली. झी 5 वरील डिजीटल प्रदर्शनाकरिता मी उत्सुक आहे. त्यामुळे आम्हाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची व्यापक संधी मिळणार आहे”.
अभिनेत्री वैदेही परशुरामी म्हणाली, “मी जेव्हा ही कथा वाचली, त्या मिनिटापासून या संकल्पनेच्या प्रेमात पडले. कोविडमुळे या सिनेमाच्या निर्मितीत अनेक अडथळे आले. मात्र प्रतीक्षेची लज्जतच निराळी होती. आता झोंबिवली भारताचा सर्वात मोठा स्वदेशी ओटीटी मंच, झी5वरून 190+ देशांत प्रदर्शित होतो आहे, हा सिनेमा सर्वांचे मन जिंकून घेईल, याची मला खात्री वाटते”.