अमिताभ बच्चन तेव्हा रामगोपाल वर्माला मारणार होते.. थोडक्यात वाचला दिग्दर्शक !
'भूत' चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राम गोपाल वर्मा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. हा चित्रपट पाहिल्यावर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया कशी होती, हेही त्यांनी सांगितले.
‘Bhoot’ Completed 20 Years : राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूत’ (Bhoot) या हॉरर चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. उर्मिला मातोंडकर आणि अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. हा हॉरर चित्रपटांच्या यादीतील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गणला जातो. त्यांच्या या चित्रपटाचा इंडस्ट्रीपासून सामान्य प्रेक्षकांपर्यंत खोलवर परिणाम कसा झाला, या बद्दल राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. वर्मा म्हणाले की, ‘भूत’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याची आईही घाबरली होती आणि ती तिच्या घराचे दरवाजे आणि नेहमी कायम बंद करत असे. ‘आपल्याच मुलाने हा चित्रपट बनवल्याचे माहीत असूनही आई खूप घाबरली होती’, असेही वर्मा यांनी नमूद केले.
अमिताभ राम गोपाल वर्मांना मारणार होते
यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या चित्रपटाबाबतची प्रतिक्रियाही उघड केली. त्यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा चित्रपटाचा प्रिव्ह्यू पाहिला तेव्हा त्यांची रिॲक्शन भन्नाट होती ‘ मला तुला धोपटावेसे वाटत आहे, असे बिग बींनी वर्मा यांच्याकडे कबूल केले. मी असा चित्रपट का बनवला, असेही त्यांनी मला विचारले. हा चित्रपट बघायला मी ( अमिताभ बच्चन) का आलो ? असा विचार करून मी स्वत:चाच तिरस्कार करत होतो,’ अशी प्रतिक्रियाही अमिताभ यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासमोर व्यक्त केली होती.
भूत मध्ये झळकणार होता अभिषेक
भूत या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राम गोपाल वर्मा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांच्या मते हॉरर चित्रपटात भावना जागृत करण्याचा दर्जा असणे आवश्यक आहे. जरी ती भावना भीती का असेना.. यादरम्यान राम गोपाल वर्मा यांनी असाही खुलासा केला की सुरुवातीला या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनची निवड करण्यात आली होती पण काही कारणास्तव तो काम करू शकला नाही आणि त्यानंतर अजय देवगणला या चित्रपटासाठी घेण्यात आले.
उर्मिला मातोंडकर आणि अजय देवगण व्यतिरिक्त राम गोपालच्या ‘भूत’ चित्रपटात नाना पाटेकर, फरदीन खान, रेखा, व्हिक्टर बॅनर्जी, बरखा मदान, सीमा विश्वास आणि तनुजा यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.