चुकीचा इतिहास दाखवल्याच्या शिर्के घराण्याच्या आरोपांवर अमोल कोल्हे स्पष्टच बोलले..
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील बलिदानाचा सीन, माध्यमाची मर्यादा, शिर्के घराण्याचे आरोप.. या सर्व विषयांवर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट मतं मांडली आहेत. या मालिकेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेबाबत मोठा खुलासा केला होता. “होय, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता”, असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामागचा अर्थ त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत उलगडून सांगितला आहे. “हा जो खोडसाळपणा सातत्याने केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला, तो दबावापोटी गुंडाळण्यात आला, अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. याला दिलेलं हे सडेतोड उत्तर होतं. दबाव होता असं कोणाला वाटत असेल तर रेग्युलेटरी अथॉरिटीच्या ज्या गाइडलाइन्स आहेत, या पाहणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण मालिका करतो, तेव्हा या माध्यमाच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यात अनेकदा प्रतिकातमक गोष्टी दाखवण्यात आल्या. परंतु हे राजकीय दबावापोटी झाल्याचं म्हणणाऱ्यांनी एकदा डोळे उघडून बघावं”, असं ते म्हणाले.
मालिकेच्या शेवटाबद्दल काय म्हणाले?
मालिकेत दाखवलेल्या अनाजी पंतांच्या इतिहासाबद्दल प्रश्न विचारण्यात आलं असता ते पुढे म्हणाले, “दुर्दैवाने हे जे कोणी पाहतं, त्यांनी बहुतेक अनाजी पंतांकडे अधिक लक्ष दिलं असावं. कारण या मालिकेत इतिहास रंजक पद्धतीने दाखवत असताना औरंगजेबाचं चित्रण तसंच करण्यात आलं आहे. फक्त बलिदान दाखवलं नाही म्हणून हे झालं असं नाही. तर बलिदान हे प्रतिकात्मक पद्धतीने दाखवलंय. अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिलं होतं का, ते दोषी नव्हते का, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण का दुर्लक्ष करतोय? कवी कलशांची उज्ज्वल प्रतिमा जी मांडली, ती का दिसली नाही? हेच दुर्दैवी आहे.”
“हा व्यापक राजकारणाचा भाग असल्याची शंका”
“हा नक्कीच व्यापक राजकारणाचा भाग असल्याच्या शंकेला वाव आहे. मुळात इतिहासाकडे आम्ही साक्षेपी नजरेनं बघतच नाही आहोत. मानवी स्वभावाकडे न बघता, फक्त जातीकडे आणि समाजाकडे बघून टारगेट करणं अत्यंत दुर्दैवी आहे. इतिहासाकडे साक्षेपी नजरेनं पाहणं गरजेचं आहे,” असं मत कोल्हेंनी मांडलंय.




शिर्के घराण्याच्या आरोपांवर मांडलं मत
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिर्के घराण्याकडून त्यावर काही आरोप करण्यात आले. त्याबद्दलही अमोल कोल्हेंनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. “त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा काळ या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेंना अद्दल घडवली का? बाजी घोरपडेंना मुधोळमध्ये जाऊन त्यांना शासन दिलं की नाही? पण म्हणून घोरपडे फितूर होतात का? नंतर माळोजी घोरपडेंनी छत्रपती संभाजी महाराज पकडले जात असताना बलिदान दिलंय. त्यामुळे कुठल्या काळामध्ये कुठला निर्णय घेतला गेला याविषयी त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.
“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याकडे आपण जोपर्यंत मानवी स्वभावाच्या दृष्टीकोनातून पाहत नाही, तोपर्यंत आपण इतिहासाकडे फक्त अभिनिवेषातून पाहतो. तर मग आपण इतिहास मांडूच शकणार नाही. त्यावेळी जे घडलं होतं, त्याला काहीतरी कारणं असतील. त्या गोष्टी झाल्या म्हणून आतासुद्धा ते फितूर आहेत का, असा अर्थ होत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
धर्मरक्षक की स्वराज्यरक्षक?
छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मरक्षक म्हणावं की स्वराज्यरक्षक यावरून मतमतांतरे आहेत. याविषयी अमोल कोल्हे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी भरपूर कामं केली. परंतु छत्रपती संभाजी महाराजांना केवळ धर्मवीर म्हटलं तर त्यांचा इतिहास हा फक्त शेवटच्या चाळीस दिवसांपुरता मर्यादित होतो का? स्वराज्यरक्षक ही त्यापेक्षा जास्त विस्तृत बिरुदावली आहे. तुम्ही त्यांना धर्मरक्षक किंवा स्वराज्यरक्षक म्हटलं तरी काही हरकत नाही. जोपर्यंत त्यांचा उज्ज्वल इतिहास ठामपणे मांडला जातोय, तोपर्यंत माझ्यासारख्या शंभूभक्ताला याविषयी कुठलाच आक्षेप असणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मी ती कोणावर लादतही नाही.”
मालिकेच्या शेवटाविषयी काय म्हणाले?
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील बलिदानाच्या सीनविषयी अमोल कोल्हे म्हणाले, “या मालिकेविषयी जे फॉल्स नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे, त्याबद्दल मी दबाव हा शब्द वापरला आहे. डोळे उघडून माध्यमाच्या मर्यादा समजून घ्याव्यात आणि अशा कोणत्याही प्रचाराला बळी पडू नये. बलिदान ही फार महत्त्वाची घटना आहे पण त्या बलिदानाने नेमकी प्रेरणा काय दिली, ती अधोरेखित होणं जास्त गरजेचं आहे. राजा नसताना सर्व रयत 18 वर्षे लढत राहिली. ही प्रेरणा आहे. कलाकार आणि शंभूभक्त म्हणून माझं हे नैतिक कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण मालिकेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप झाला नाही. शरद पवार यांनी कलाकारांना दिलेलं स्वातंत्र्य त्यांनी कायम जपलेलं आहे. जे कोणी राजकीय हेतूने असे आरोप करत आहेत, त्यांचा बुरखा फाडला जातोय.”