प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादावर अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले..
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वादावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ताने शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसंच आपली भूमिकाही स्पष्ट केली. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं म्हणत प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर मागावी, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसह प्राजक्ताचंही नाव घेत टिप्पणी केली होती. याप्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य मी ऐकलंय. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सबाबत ते वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला वेगळं वळण देण्याची गरज नाही, असं मला वाटतं. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही. पण पुराव्यांशिवाय कोणावरही शिंतोडे उडवता कामा नये. धसांच्या वक्तव्यावरून मला जेवढं समजलं त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंट पॉलिटिक्सबाबत वक्तव्य केलं होतं. यापलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो फक्त अभिनेत्रीच काय तर कोणाच्याबी बाबत होता कामा नये”, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.
यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “सरकारमधील एका मंत्र्यावर सततत आरोप होत असतील आणि संशयाचे धुके बाजूला होत नसेल तर एकूणच सरकारच्या कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालायच हवा. यात जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असं ते म्हणाले.
भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस हे रोज माध्यमांशी बोलताना अनेक गौप्यस्फोट करत आहेत. सुरेश धस बोलताना सतत आकाचा उल्लेख करतात. आकाची बीडमध्ये दहशत आहे, असा धस यांचा दावा आहे. सुरेश धस यांनी अजून आकाच नाव उघड केलेलं नाही. पण टीका करताना त्यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी यांची नावं त्यांनी घेतली.