‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा
अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेबाबत मोठा खुलासा केला आहे. मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असं ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका होता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेबाबत आता कोल्हेंनी खुलासा केला आहे. “होय, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता”, असं त्यांनी म्हटलंय. ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. मात्र मालिकेत अमोल कोल्हेंनी तो सीन दाखवला नव्हता. “माझ्यावर माध्यमांचा दबाव होता”, असा खुलासा कोल्हेंनी केला आहे.
“मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं,” असं ते म्हणाले.
“आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का, असा प्रश्न मी आमच्या हेतूंवर शंका घेणाऱ्यांना विचारतो. मला अशा ट्रोलर्सची कीव येते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण केलं तेव्हा पाहिली. त्यामुळे 2019 च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती,” असाही खुलासा कोल्हेंनी केला.




लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिलेले प्रेक्षक थिएटरमधून पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर येत आहेत. मात्र माध्यमांच्या दबावामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटी ते सर्व काही दाखवलं नाही, असं कोल्हेंनी स्पष्ट केलंय. चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये आणि त्यांच्या प्रेक्षकवर्गामुळे खूप फरक असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.