ब्रेकअपनंतरही ती सुशांतसाठी..; विकीच्या आईला अंकिता लोखंडेच्या आईचं प्रत्युत्तर
अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करताना दिसली. ती असं प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी करते, असा आरोप तिच्या सासूने केला. त्यावर आता अंकिताच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत आणि अंकिताचं नातं कसं होतं, याबद्दल त्या व्यक्त झाल्या आहेत.
मुंबई : 12 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’मध्ये फॅमिली वीक पार पडल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या पती-पत्नीमधील नातं सर्वाधिक चर्चेत आलं आहे. फॅमिली वीकदरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिताची आई वंदना लोखंडे आणि विकीची आई रंजना जैन दोघांना भेटायला गेल्या होत्या. बिग बॉसच्या घरातही अंकिताचं सासूशी वाजलं आणि तिथून बाहेर आल्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये रंजना या अंकिताबद्दल बरंवाईट बोलताना दिसल्या. प्रेक्षकांची आणि इतर स्पर्धकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अंकिता घरात सतत सुशांत सिंह राजूपतचं नाव घेते, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यावर आता अंकिताच्या आईने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. जून 2020 मध्ये सुशांत मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. अंकिता आणि सुशांत हे जवळपास सहा ते सात वर्षे एकमेकांना डेट करत होते.
काय म्हणाली अंकिताची आई?
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत वंदना लोखंडे म्हणाल्या, “सुशांतचं नावं घेणं म्हणजे अंकिताची कोणती स्ट्रॅटेजी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी नाही. ते दोघं जवळपास आठ वर्षे सोबत होते आणि सुशांतसोबत अंकिताने तिच्या आयुष्यातील एका टप्प्याचा प्रवास केला आहे. ब्रेकअपनंतरही ती नेहमीच सुशांतच्या भल्यासाठी विचार करायची. त्यामुळे जेव्हा सुशांतचं निधन झालं, तेव्हा ती पूर्णपणे खचली होती. कारण त्या दोघांमध्ये तसंच नातं होतं.”
View this post on Instagram
अंकिता आणि सुशांत यांची पहिली भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. मानव आणि अर्चना या भूमिका दोघांनी साकारल्या होत्या आणि त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. सुशांत आणि अंकिताच्या जोडीला आजही अनेकांची पसंती मिळते. मात्र अंकिता प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी सतत सुशांतचा उल्लेख करते, असा आरोप तिच्या सासूने एका मुलाखतीत केला होता. “ती स्वत:साठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय. सुशांतला काय माहीत, तो तर गेला. तो जेव्हा होता, तेव्हासुद्धा त्याने अनेकांचं प्रेम मिळवलं होतं. त्याने किती चांगली कामं केली होती”, असं त्या म्हणाल्या होत्या.