Ankita Lokhande | “रुममध्ये एकटीचे होते अन्..”; अंकितानं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने काम मिळत नसल्याचं सांगितलं होतं. “मणिकर्णिका या चित्रपटानंतर माझ्या हातात कोणताच प्रोजेक्ट आला नाही आणि खरं सांगायचं झालं तर माझा इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही," असं ती म्हणाली.
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं तिच्या करिअरची सुरुवात ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या रिअॅलिटी शोमधून केली. मात्र तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे मिळाली. अंकिताने टीव्ही इंडस्ट्रीत काम करत बॉलिवूडपर्यंत मजल मारली. अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या या प्रवासात अंकिताला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी एका निर्मात्याने अंकितासोबत कास्टिंग काऊच केलं होतं.
ही घटना तेव्हाची आहे जेव्हा अंकिता अवघ्या 19 वर्षांची होती आणि तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्य़ावेळी अंकिताला साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी तिला मिटींगला बोलावलं होतं. या मिटींगदरम्यान ती रुममध्ये संबंधित निर्मात्यासोबत एकटीच होती. सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्याने अंकिताला स्पष्ट म्हटलं की तुला कॉम्प्रमाइज करावं लागेल. हे ऐकून अंकिताला धक्काच बसला. मात्र चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव न आणता तिने संबंधित निर्मात्याला चांगलंच सुनावलं.
View this post on Instagram
अंकितासोबत अशी घटना एकदा नाही तर दोनदा घडली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर अंकिता जेव्हा चित्रपटांमध्ये काम शोधत होती, तेव्हा एका मोठ्या व्यक्तीशी तिची भेट झाली. कामानिमित्त त्या व्यक्तीशी हात मिळवताच अंकिताला समजलं की काहीतरी चुकीचं आहे. अखेर ती मिटींग सोडून तिथून निघून आली. “माझ्यासाठी चित्रपटांपेक्षा जास्त प्रिय माझा आत्मसन्मान आहे. कधी कधी लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करावी लागते. पण मी खुश आहे की मी असं कधीच केलं नाही”, असं अंकिताने स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने काम मिळत नसल्याचं सांगितलं होतं. “मणिकर्णिका या चित्रपटानंतर माझ्या हातात कोणताच प्रोजेक्ट आला नाही आणि खरं सांगायचं झालं तर माझा इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. मी प्रतिभावान आहे, हे मला माहीत आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझा कोणी गॉडफादर नाही”, असं ती म्हणाली होती.