Satish Kaushik | ‘जा तुला माफ केलं’, सतीश कौशिक यांच्याबद्दल अनुपम खेर असं का म्हणाले?
सतीश कौशिक मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता.
मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक सतीश कौशिक यांनी 9 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. गुरुग्राममध्ये एका मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं. नुकतंच मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या प्रार्थना सभेला सतीश यांचे जवळचे मित्र अनुपम खेर, अभिनेत्री विद्या बालन यांसारखे बरेच कलाकार पोहोचले आणि त्यांनी कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. या प्रार्थना सभेनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.
या व्हिडीओमध्ये अनुपम खेर हे सतीश कौशिक यांच्या फोटोसमोर फुलं वाहताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा सहज पहायला मिळतोय. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी त्यांच्या खास मित्रासाठी पुन्हा एकदा भावूक पोस्ट लिहिली आहे.
‘जा, तुला माफ केलं. मला एकटं सोडून गेलास म्हणून. लोकांच्या हास्यात मी तुला नक्कीच शोधेन. मात्र प्रत्येक दिवशी मला आपल्या मैत्रीची कमतरता जाणवेल. अलविदा माझ्या मित्रा.. बॅकग्राऊंडमध्ये तुझं आवडतं गाणं लावलंय. तू पण काय आठवण काढशील’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ हे गाणं ऐकू येत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
प्रार्थना सभेनंतर माध्यमांशी बोलताना अनुपम खेर म्हणाले, “मला वाटतं सतीश कौशिक यांना आपण सन्मानपूर्वक निरोप दिला पाहिजे. त्यांच्याबद्दल कोणत्याच अफवा पसरवल्या जाऊ नयेत. या ज्या काही अफवा पसरत आहेत, त्यांचा आज या पूजेसोबतच खात्मा होऊ दे.”
सतीश कौशिक मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता. तरीही मृत्यूचं निश्चित कारण न समजल्याने त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं होतं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं होतं.
मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.