भारतीय संगीत विश्वाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे ए. आर. रहमान (AR Rahman) हे ‘ले मस्क’ (Le Musk)सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पहिल्यांच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रहमान यांनीच या सिनेमाची गोष्ट लिहिली आहे. या सिनेमाची मूळ कल्पना ही रहमान यांची पत्नी सायरा यांची आहे. ले मस्क ही एक शॉर्ट फिल्म आहे. 36 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनिंग यंदाच्या कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) पार पडणार आहे. ऑनलाईन-ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. ले मस्क ही एक म्युझिक फिल्म असणार आहे. 2022 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या सिनेमाची संपूर्ण सिनेक्षेत्रात उत्सुकता आहे. कारण संगीत दिग्दर्शनात आणि गायनात आपल्या दर्जेदार कामानं नाव मिळवलेल्या रहमान यांचा डिरेक्टोरीअल डेब्यू या सिनेमातून होतोय. त्यामुळेच या सिनेमाला खास महत्त्व प्राप्त झालंय.
राजकुमारी आणि संगीतकार ज्युलिएट मर्डिनियन यांच्या आयुष्यावर आधारित ही शॉर्ट फिल्म आहे. यामध्ये मुनिरीह ग्रेस, मरियम जोहराबयान, नोरा अर्नेजेडर आणि गाइ बर्नेट यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 17 मे ते 26 मे दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. यंदा कान्समध्ये भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’चा मान मिळाला आहे. या चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधींमध्ये रहमान यांचाही समावेश आहे.
“ले मस्क हा चित्रपट जगभरातील प्रस्तुतकर्त्यांसोबत बनवण्यास बरीच वर्षे लागली आहेत. या चित्रपटातून अभूतपूर्व सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत,” अशी प्रतिक्रिया रहमान यांनी दिली. तर चित्रपटाची मुख्य अभिनेत्री नोरा म्हणाली की “रहमान यांच्यासोबत काम करणं हा एक सुंदर प्रवास होता.” रहमान यांच्यासोबत काम केल्यानंतर तिला कलात्मक अभिव्यक्ती मिळाल्याचं तिने सांगितलं.