तिसरं लग्न कधी? युजरच्या प्रश्नावर अरबाज खानचं भन्नाट उत्तर
अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा लग्न केलं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका युजरने अरबाजला त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला.
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. गेल्या वर्षी त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं होतं. वयातील अंतरामुळे ही जोडी अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता अरबाजने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ (AMA) सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने अरबाजला थेट त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अरबाजनेही मजेशीर प्रतिक्रिया दिली. अरबाज खानने 1997 मध्ये अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. तर 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.
‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये एका युजरने अरबाजसमोर त्याचा भाऊ सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मला तुमच्या मोठ्या भावाची बायको व्हायचंय. यावर तुम्ही काय म्हणाल’, असा प्रश्न एका युजरने अरबाजला विचारला होता. त्यावर अरबाजने उत्तर दिलं, ‘मी काय म्हणू? लगे रहो मुन्नाभाई.’ यासोबतच त्याने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. आणखी एका युजरने अरबाजच्या तिसऱ्या लग्नाविषयी विचारलं. ‘पुढील लग्न’, असा प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर देताना अरबाजने लिहिलं, ‘बस हो गया भाई’ (पुरे झालं आता भावा) यासोबत तो हसण्याचा आणि हात जोडल्याचा इमोजी पोस्ट करतो.
आणखी एका युजरने अरबाजला त्याच्या पत्नीच्या स्वयंपाकाबद्दलही प्रश्न विचारला. ‘शुरा सर्वांत चांगली कोणती गोष्ट बनवते’, असा सवाल संबंधित युजरने केला होता. त्यावर अरबाज हसण्याचा इमोजी पोस्ट करत लिहितो, ‘कथा..’ नंतर तो म्हणतो, ‘मी फक्त मस्करी करतोय. ती मटण बिर्याणी खूप चांगलं बनवते.’ या प्रश्नोत्तरांदरम्यान अरबाजने त्याच्या आवडत्या व्यक्तीचंही नाव सांगितलं. यावेळी त्याने त्याचे वडील सलिम खान यांचं नाव घेतलं.
‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुराशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही फार एकमेकांशी बोललो नाही. पण शूटिंग संपल्यानंतरच्या पार्टीत आम्ही एकमेकांशी बोलले. त्यानंतर हळूहळू संपर्क वाढला. आमच्यात बरंच काही साम्य आहे. एकमेकांशी भेटून, बोलून आमच्यात प्रेमाची भावना निर्माण झाली. आम्ही दोघं आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर होतो, जिथे आम्हाला पार्टनरसोबत स्थिर व्हायचं होतं. एकमेकांमध्ये अनेक भावना गुंतल्याने अखेर आम्ही पुढील आयुष्य सोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.”