Archana Gautam | बिग बॉसमध्ये कशी केली जाते स्पर्धकांची निवड? अर्चना गौतमने केला खुलासा
अर्चना ही बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. आपल्या जबरदस्त खेळीमुळे ती टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचली होती. मात्र तिच्या काही गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या होत्या. शिव ठाकरेसोबतच्या भांडणानंतर तिला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं.
मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये स्पर्धकांची निवड कशी केली जाते, याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अर्चना गौतमने याविषयीचा खुलासा केला आहे. अर्चनाची बिग बॉसमध्ये एण्ट्री कशी झाली, कोणाच्या माध्यमातून झाली आणि ती संपूर्ण प्रक्रिया कशी होती, या प्रश्नांची उत्तरं तिने सविस्तरपणे दिली आहेत.
अर्चनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉस या शोबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. मेरठच्या हस्तिनापूरची अर्चना बिग बॉसच्या घरात कशी पोहोचली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता त्यावरून खुद्द अर्चनानेच पडदा उचलला आहे.
अर्चना गौतमने कोणाशी संपर्क साधला?
अर्चनाने सांगितलं की तिने एका कास्टिंग डायरेक्टरशी संपर्क केला होता आणि बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्या कास्टिंग डायरेक्टरने अर्चनाचा प्रोफाइल बिग बॉसपर्यंत पोहोचवला. काही दिवसांनी बिग बॉसच्या कार्यालयातून अर्चनाला फोन आला आणि तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं.
View this post on Instagram
ऑडिशनदरम्यान क्लिअर केले पाच राऊंड
बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी अर्चनाला ऑडिशन्सचे पाच राऊंड क्लिअर करावे लागले होते. अर्चनाने सांगितलं की बिग बॉसच्या हेडसोबत तिची व्हिडीओ कॉलद्वारे मीटिंग झाली होती. त्या सर्व राऊंड्सनंतर अर्चनाला बिग बॉसच्या घराचं तिकिट मिळालं. अर्चनाने हेसुद्धा सांगितलं की तिला जोकर मास्क घालून बिग बॉसच्या घरात पाठवलं होतं.
अर्चना ही बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. आपल्या जबरदस्त खेळीमुळे ती टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचली होती. मात्र तिच्या काही गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या होत्या. शिव ठाकरेसोबतच्या भांडणानंतर तिला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा तिची घरात एण्ट्री झाली होती.