ज्यांनी माझ्यावर शंका घेतली..; अर्जुन कपूरचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
अभिनेता अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या यशानंतर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.
अभिनेता अर्जुन कपूरने ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘टू स्टेट्स’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘पानिपत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र एक अभिनेता म्हणून आपली विशेष छाप सोडण्यात तो अपयशी ठरला. आता दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका अत्यंत दमदार पद्धतीने साकारली असून प्रेक्षकांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे. इतकंच काय तर ते लोक अर्जुनला त्याच्या अभिनयाबद्दल ट्रोल करायचे, तेच आता त्याची स्तुती करत आहेत. ‘सिंघम अगेन’च्या निमित्ताने मिळणाऱ्या या यशानिमित्त अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अर्जुनने इन्स्टाग्रामवर काही मीम्स पोस्ट केले आहेत. ‘सिंघम अगेन’मधील त्याच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं कौतुक करणारे हे मीम्स आहेत. या मीम्सच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘ज्यांना माझ्या कामगिरीवर अविश्वास होता, त्याचं रुपांतर विश्वासात करून दाखवलं. प्रत्येक प्रश्न आणि शंकेनं मला केवळ अजून अधिक मेहनत घेण्यास आणि मजबूत कलाकार होऊन समोर येण्यास भाग पाडलं. ज्यांनी तेव्हाही माझी साथ दिली आणि आताही देत आहेत, त्यांचे आभार. तुमची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ज्यांनी माझ्यावर शंका घेतली, त्यांचेही आभार. त्यांनी मला पुन्हा सिद्ध करण्याची संधी दिली. आतापर्यंतचा हा प्रवास किती सुंदर होता. मला पुन्हा पदार्पण केल्याची भावना जाणवतेय आणि अजून मला खूप पुढे जायचंय. प्रत्येक पायरी, प्रत्येक शिकवण आणि प्रत्येक प्रेमासाठी मी कृतज्ञ आहे.’
View this post on Instagram
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अर्जुन कपूरसोबतच अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, रवी किशन यांच्याही भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. ‘सिंघम’ फ्रँचाइजीमधील हा तिसरा चित्रपट आहे. तर रोहित शेट्टीच्या पोलिसांच्या चित्रपटांच्या यादीतील हा पाचवा चित्रपट आहे. याआधी त्याने सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते.