‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे एक संस्थापक मोहम्मद झुबेर (Mohammed Zubair) यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. चार वर्षांपूर्वीच्या ट्विटप्रकरणी ही कारवाई झाली आहे. एका ट्विटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. झुबेर यांच्या अटकेवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यातच अभिनेता आरोह वेलणकरचं (Aroh Welankar) ट्विट चर्चेत आलं आहे. आरोहने अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) झालेल्या अटकेचा संदर्भ घेत झुबेर यांच्या अटकेवरून संताप व्यक्त करणाऱ्यांसाठी ट्विट केलं आहे.
‘झुबेर यांच्या अटकेबद्दल आक्रोश करणार्या लोकांनी केतकी चितळेला फेसबुक पोस्ट फॉरवर्ड केल्याबद्दल 30 दिवस तुरुंगात ठेवलं होतं हे लक्षात ठेवावं. ढोंगी लोक. ही लॉबी उघड होतेय ही चांगली गोष्ट आहे,’ असं त्याने म्हटलंय. झुबेर यांनी एका विशिष्ट धर्माच्या दैवताचा अपमान करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर 2018च्या मार्चमध्ये पोस्ट केला होता, असं पोलिसांनी सांगितलं. ट्विटर युजरच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 153- ए (समाजात द्वेष पसरवणं) आणि 295- ए (धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने द्वेषमूलक कृत्य करणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
People whining over Zubair arrest must remember Ketaki Chitale was kept in jail for 30 days for a forwarded fb post. Hypocrites. Good thing the lobby keeps getting exposed. #KetakiChitale #MohammedZubair
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 28, 2022
खोट्या बातम्यांमधील सत्य तपासून ते लोकांसमोर मांडण्यासाठी मोहम्मद झुबेर आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रतीक सिन्हा यांनी अल्ट न्यूज ही वेबसाइट 2017 मध्ये सुरू केली होती. झुबेर यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांवर प्रकाश टाकला होता.
अल्ट न्यूज विश्वगुरुंचे खोटे दावे उघड करण्यात आघाडीवर आहे, त्यामुळे त्यांच्यावर सूड घेण्यात आला आहे, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटलं. तर सत्याचा एक आवाज बंद केल्याने असे हजारो आवाज उठतील, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.