सलमानला भेटून मला… भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खान कुटुंबासोबत लंच
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना जेव्हा एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कलाविश्वातील नामांकित व्यक्तीला भेटते, तेव्हा सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होता. सध्या अशाच एका फोटोची ट्विटरवर जोरदार चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्षाकडून प्रचारासाठी आणि उमेदवारांची नावं जाहीर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत कलाविश्वातील काही नामांकित जणांनी राजकारणात प्रवेश केला. अभिनेत्री कंगना राणौत, अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला. हे दोघं भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर अभिनेता गोविंदाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता आशिष शेलार यांनी सलमान खानची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशिष शेलार यांनी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या भेटीचा फोटो एक्सवर (ट्विटर) पोस्ट केला आहे.
सलमान आणि सलीम खान यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत आशिष शेलार यांनी लिहिलं, ‘सलीम खान, हेलनजी आणि सलमान खान यांना भेटून आनंद झाला. त्यांच्यासोबत दुपारचं जेवण केलं आणि आरोग्य सेवा, गरजूंना मदत कसं करता या त्यांच्या सामाजिक कार्यावर चर्चा केली. सलीमजींनी हे कार्य सुरू केलं आणि गेल्या दोन दशकांपासून ते अत्यंत प्रामाणिकपणे पाठपुरावा करत आहेत.’
आशिष शेलार यांची पोस्ट-
Pleased to meet Shri Salim Khan ji, Smt Helen ji, @BeingSalmanKhan & family over lunch & discuss their social work in areas of healthcare & assisting the needy- started by Salim ji & pursued for two decades with utmost sincerity!! #Charity pic.twitter.com/TNq4IvQsKy
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) April 7, 2024
सलमानचे वडील सलीम खान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. स्वत: सलमानसुद्धा त्याच्या ‘बीईंग ह्युमन’ या संस्थेद्वारे समाजकार्य करतो. अभिनय क्षेत्रासोबत खान कुटुंबीय विविध कार्यात आवर्जून सहभागी होतात. त्यांच्या याच कामाबद्दल चर्चा करण्यासाठी आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली.
सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामध्ये सलमानने कतरिना कैफसोबत भूमिका साकारली होती. ‘टायगर 3’नंतर तो दिग्दर्शक ए. आर. मुहुगदोस आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांच्यासोबत आगामी चित्रपटासाठी काम करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.