“ते मला मारायचे, खोलीत बंद करायचे असं काहीही..”; आशिष विद्यार्थी यांच्या पूर्व पत्नीकडून घटस्फोटाबाबत मोठा खुलासा
22 वर्षांच्या संसारानंतर दोघं विभक्त झाले. या दोघांच्या घटस्फोटावरून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पिलू विद्यार्थी यांनी मौन सोडलं आहे.
मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली, तेव्हा सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा झाली. अभिनेत्री राजोशी बरुआ ऊर्फ पिलू विद्यार्थी यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. 22 वर्षांच्या संसारानंतर दोघं विभक्त झाले. या दोघांच्या घटस्फोटावरून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पिलू विद्यार्थी यांनी मौन सोडलं आहे. पिलू यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याचाही खुलासा त्यांनी केला.
वैवाहिक आयुष्यात नेमकं कुठे बिनलसं?
“लोकांना ठराविक समस्या शोधून काढायच्या असतात. पण आमच्या आयुष्यात तशी काही समस्याच नव्हती. यावर लोकांना विश्वासच बसत नाही. असं कसं होऊ शकतं, असा प्रश्न त्यांना पडतो. आमच्यात ठराविक कनेक्शन आहे, आपुलकी आहे. फक्त आमचे मार्ग एकत्र येत नाहीत. आम्ही जवळपास दीड वर्षे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं भविष्य एकमेकांपासून वेगळंच दिसत होतं. फेसबुकवर अनेक महिलांनी असं लिहिलं की मी खोटं बोलतेय. पण लोकांची मानसिकता खूप गुंतागुंतीची असते. मी आज खरंच खूप खुश आहे”, असं त्या म्हणाल्या.
घटस्फोटासाठी एखादं विशेष कारण असावंच लागतं असं नाही, हे स्पष्ट करताना त्या पुढे म्हणाल्या, “माझं सासरच्या मंडळींशीही खूप चांगलं नातं आहे. ते सर्वजण माझ्यासोबत खूप चांगल्याप्रकारे बोलतात, कारण आमच्यात कधी समस्याच नव्हती. त्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की, हे दोघं इतकी वर्षे सोबत होती आणि आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मला लोकांना हे सत्य सांगावं लागतं की मी खरंच आता खुश आहे, स्वतंत्र आहे, मोकळ्या मनाची कलाकार आहे. एक चांगली मुलगी, सून, पत्नी, आई या सर्व भूमिका मी उत्तमरित्या पार पाडल्या. माझ्या मुलासोबतचं नातंही खूप छान आहे आणि त्यानेही आमचा निर्णय स्वीकारला आहे.”
View this post on Instagram
या निर्णयात आशिष विद्यार्थी यांनी कशी साथ दिली, त्याविषयीही पिलू व्यक्त झाल्या. “मी जगभरातील विविध कुटुंबांमध्ये हे पाहिलंय, की महिलांना पत्नीच्या भूमिकेतच कसं खुश राहावं ते शिकवलं जातं. पण त्यात मी खुश नव्हते. एक पत्नी म्हणून माझ्याकडून ज्या पतीच्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकत नव्हते. एका टप्प्यानंतर मी ही गोष्ट स्वीकारली होती. पण याचा अर्थ असा नाही की ते मला मारायचे, खोलीत बंद करायचे. असं काहीच नव्हतं. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. कोणीच योग्य किंवा अयोग्य नसतो. एका टप्प्यानंतर मी पत्नी म्हणून राहू शकत नाही, हे मला कळून चुकलं होतं. त्यामुळे हे सत्य मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा ते स्वीकारलं. यात कोणाचीच चूक नाही”, असं त्या पुढे म्हणाल्या.