आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीने व्यक्त केला पश्चात्ताप; म्हणाल्या “मी असं का केलं..”
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलंय. कोलकातामध्ये त्यांनी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 25 मे रोजी कोलकातामधील एका खासगी समारंभात त्यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केले होते. या पोस्टमधून त्यांनी आशिष यांना टोमणा मारल्याचा आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी दु:ख व्यक्त केल्याचा अर्थ नेटकऱ्यांनी काढला होता. त्यावर आता राजोशी यांनी मौन सोडलं आहे.
काय होती राजोशी यांची पोस्ट?
आपण ज्या व्यक्तीला योग्य व्यक्ती समजतो, तीच व्यक्ती जेव्हा आपलं मन दुखावते, अशा आशयाची त्यांची पहिली पोस्ट होती. “समोरच्या व्यक्तीसाठी तुमचं महत्त्व काय आहे, असा प्रश्न योग्य व्यक्ती कधीच उपस्थित होऊ देत नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दु:ख होतं अशा गोष्टी ते करत नाहीत. लक्षात ठेवा”, असं पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. ‘तुमच्या मनातील अतिविचार आणि शंका लगेचच दूर जाऊ दे. संभ्रमाची जागा स्पष्टताने घेऊ दे. तुमचं आयुष्य शांततेने परिपूर्ण होऊ दे. बराच काळ तुम्ही धैर्याने राहण्याचा प्रयत्न केला, पण आता चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची वेळ झाली आहे. त्यावर तुमचा हक्क आहे’, अशी त्यांची दुसरी पोस्ट होती.
View this post on Instagram
पोस्टबद्दल राजोशी यांचं स्पष्टीकरण
या पोस्टबद्दल आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजोशी म्हणाल्या, “मी सकाळी उठले आणि अर्थने (मुलगा) मला त्या पोस्टबद्दलच्या वृत्तांबद्दल सांगितलं. तो खूपच विनोदी बोलत होता. मला इन्स्टाग्रामवरील या गोष्टी खरंच समजत नाहीत. मी ते शेअर तरी का केलं, असा प्रश्न मला नंतर पडला. अशा छोट्या गोष्टींसाठी मी माझा मेंदू वापरत नाही. मी माझ्या मनाचं ऐकून त्यानुसार करते. पण नंतर मी ते पोस्ट डिलिट केले.”
“मी ते पोस्ट जाणूनबुजून शेअर केले नव्हते. मी सहसा मला आवडलेल्या पोस्ट शेअर करत असते. पण त्यावेळी पोस्ट शेअर करण्याआधी मला विचार करायला पाहिजे होतं. माझा मेंदू वापरायला पाहिजे होता. माझ्या अनेक मैत्रिणींनीही याआधीही सांगितलं होतं की अशा गोष्टी शेअर करू नकोस. पण मी भावनिक व्यक्ती असल्याने अशा गोष्टी पटकन विसरून जाते”, असं त्या पुढे म्हणाल्या.