“माझ्यासमोर तो कधीच..”; अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना दिला उजाळा
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अशोकमामांनी लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत बरेच चित्रपट केले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सिनेसृष्टीत लोकप्रिय होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला. “माझ्याबद्दल त्याच्या मनात एक आदरयुक्त भीती होती. माझ्यासमोर तो फार काही बोलायचा नाही, फालतूगिरी करायचा नाही, वाटेल तसा वागायचा नाही, कधी वाकड्यात जाऊन बोलायचा नाही,” असं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले अशोक सराफ?
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले, “तो खूप प्रतिभावान होता, त्याबद्दल काही वादच नाही. त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. नट कुठलाही असो किंवा माणूस कुठलाही असो.. शून्यातून इतकं वर येणं फार कठीण असतं. सर्वांनाच ते जमत नाही. पण त्याने केलं. माझ्यासोबत त्याने जवळपास 50 चित्रपट केले. काम करता करता डेव्हलप करून तो कुठल्या कुठे गेला. मी जेव्हा टॉपला होतो तेव्हा तो सिनेसृष्टीत आला होता. त्यामुळे माझ्याबद्दल त्याच्या मनात एक आदरयुक्त भीती होती. माझ्यासमोर तो फार काही बोलायचा नाही, फालतूगिरी करायचा नाही, वाटेल तसा वागायचा नाही, कधी वाकड्यात जाऊन बोलायचा नाही. काय धमाल करायची ती इतरांसोबत, पण मी असताना तो कधीच असं करायचा नाही. हा त्याच्या स्वभावातील चांगुलपणा होता.”
“आदरयुक्त भीतीमुळे तो माझ्याशी फार बोलायचा नाही. पण तो खूप प्रतिभावान होता. त्याच्या डान्सचे मूमेंट्स शार्प असायचे. तो फार मोठा डान्सर कधी नव्हताच. मीसुद्धा नव्हतो. पण त्याचे मूमेंट्स शार्प असायचे. माझ्यासोबत त्याने 50 चित्रपट केले. त्यानंतर माझ्याशिवाय हिरो म्हणून त्याने असंख्य चित्रपट केले. माझ्यासोबत तो सहाय्यक भूमिकेत असायचा”, असं ते पुढे म्हणाले.




अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘धूमधडाका’, ‘शेजारी शेजारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘धरलं तर चावतंय’, ‘गोडी गुलाबी’, ‘चंगू मंगू’, ‘फेका फेकी’, ‘इजा बिजा तिजा’, ‘सगळीकडे बोंबाबोब’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘मामला पोरींचा’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘गोडीगुलाबी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या दोघांची जोडी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.