Ravindra Mahajani | रवींद्र महाजनी यांच्या निधनावर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया; म्हणाले “एकमेव देखणा नट..”
वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुलगा गश्मीर महाजनी तळेगाव दाभाडेकडे रवाना झाला. सध्या रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं.
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. तर रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. महाजनी यांच्या निधनावर अभिनेते अशोक सराफ यांनी शोक व्यक्त केला.
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ते म्हणाले, “आमच्या पिढीतील एकमेव देखणा नट आम्ही गमावला. तो हिरो आणि मी सहाय्यक भूमिकेत असं आम्ही बऱ्याचदा एकत्र चित्रपटात काम केलं आहे. त्यात काही यशस्वी चित्रपटांचाही समावेश आहे. पण एक चांगला माणूस, चांगला मित्र गेल्याचं खूप वाईट वाटतंय. हसमुख चेहऱ्याचा आणि नेहमी हसत-खेळत वावरणारा तो नट होता. त्याच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. प्रत्येक भूमिका तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तम साकारायचा. त्याने जे काम केलं, ते मनापासून केलं. त्यामुळे त्या काळातला तो यशस्वी अभिनेता होता.”
वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुलगा गश्मीर महाजनी तळेगाव दाभाडेकडे रवाना झाला. सध्या रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच ते नाटकात-चित्रपटात शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली.
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.