Akanksha Dubey | कमी वयात नावंही कमावलं अन् पैसाही; लाखोंची संपत्ती सोडून गेली आकांक्षा दुबे
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बदला आहे. आकांक्षाने कमी वयातच आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिद्धीसोबतच तिने पैसाही कमावला.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या वृत्ताने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये 25 वर्षीय आकांक्षाने आपलं आयुष्य संपवलं. 2019 मध्ये तिने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘मेरी जंग मेरा फैसला’ हा तिचा पहिला चित्रपट होता. आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि फार कमी वेळात तिला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकप्रियतेसोबतच आकांक्षाने पैसाही कमावला. वयाच्या 25 व्या वर्षी लाखोंची संपत्ती मागे सोडून आकांक्षाने टोकाचं पाऊल उचललं.
भोजपुरी चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओसोबत आकांक्षा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरुनही पैसे कमवायची. याशिवाय तिचा एक युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर हजारो सबस्क्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आकांक्षा एका चित्रपटासाठी जवळपास दोन लाख रुपये मानधन घ्यायची. तिचे म्युझिक व्हिडीओजसुद्धा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होते. अशा पद्धतीने आकांक्षा दर महिन्याला जवळपास 60 ते 70 हजार रुपयांची कमाई करायची. आकांक्षाचं वय फक्त 25 वर्षे होतं. इतक्या कमी वयात तिची लाखोंची संपत्ती होती. तिची एकूण संपत्ती ही 50 ते 60 लाख रुपये इतकी होती.
View this post on Instagram
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.
आत्महत्येच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसतेय. जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंगसोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते.
मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.