सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठी अपडेट, हल्लेखोराच्या वकिलांचा धक्कादायक दावा
Saif Ali Khan case: सैफ अली खान प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा, 'प्रकरणात काही तथ्य फक्त नाही. पोलिसांकडे देखील...', प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरु...

अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. सैफ याच्यावर हल्ला करणारा आरोपी शरीफूल इस्लाम शहजाद याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. शरीफुलच्या वकिलाने दावा केला आहे की शरीफुल याच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी सैफ याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ज्यामुळे पोलिसांनी शरीफूल याला ताब्यात घेतलं. शरीफूल याने सैफ आणि अभिनेत्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ज्यामुळे दोघांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शरीफुलने आपल्या जामीन अर्जात असा दावा केला आहे की, आपण कोणताही गुन्हा केलेला नाही आणि आपल्याला या प्रकरणात खोटे गोवले जात आहे. शिवाय आरोपीच्या वकिलांनी देखील मोठा दावा केला आहे. आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं, पोलिसांकडे देखील कोणते ठोस पुरावे नाहीत.




View this post on Instagram
वकील पुढे म्हणाले, ‘एफआयआरमध्ये अनेक त्रुटी आहेत. शरीफूल याने तपासात पूर्ण सहकार्य केले असून त्याची जामिनावर सुटका करावी… अशी मागणी देखील कोर्टाकडे करण्यात आली आहे. याचिकेत म्हणण्यात आलं आहे की, ‘एफआयआर पूर्णपणे खोटा आहे. शरीफूल विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
शरीफूल अधिकाऱ्यांना सहकार्य करत असून त्याला जामीन मिळाला तरी तो पुराव्याशी छेडछाड करणार नाही, असा युक्तिवादही त्याच्या वकिलाने केला. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी अद्याप चार्जशीट दाखल केलेली नाही. हे प्रकरण सध्या वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र सत्र न्यायालयाने जामीन याचिकेवर सुनावणी सुरू केली आहे. शरीफूलच्या जामीन अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
सैफ अली खान हल्ला प्रकरण?
16 जानेवारी रोजी मध्यरात्री एका हल्लेखोराने सैफ अली खान याच्या घरावर हल्ला केला. ज्यामुळे अभिनेता गंभीर जखमी झाला. अशात रात्री 2 वाजता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.