कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 18’ या लोकप्रिय शोमधून वकील गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले आहेत. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सदावर्तेंची एक वेगळीच बाजू पहायला मिळाली होती. शोच्या पहिल्या दिवसापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आले होते. परंतु मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीसाठी त्यांनी घरातून मध्येच बाहेर पडावं लागलं. ही कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतर ते पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत ते अभिनेता सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्याबद्दलही व्यक्त झाले. सलमान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यातील वाद मिटवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का, असा प्रश्न सदावर्तेंना यावेळी विचारण्यात आला होता.
यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हे पहा, बिष्णोई समाज हा खूप चांगला समाज आहे. आम्ही सर्व समाजांचा आदर करतो. सलमान खानसुद्धा खूप चांगला कलाकार आहे आणि त्याने स्वत: असं म्हटलंय की कलाकारांनाही मदतीची गरज असते. आपण साधू-संतांशीही बोललं पाहिजे. मला असं वाटतं की बिष्णोई समाजाच्या प्रमुख लोकांशी जर संवाद साधला तर ते नक्कीच सलमानची बाजू ऐकून घेतील. बाकी रक्षा-सुरक्षा प्रभू रामचंद्र यांच्या हाती आहे. प्रभू रामचंद्र यांच्या मार्गावर चालणं म्हणजे संविधानाच्या सर्वसामान्य मूल्यांचं पालन करणं आहे. ज्यांनी आपलं संविधान वाचलंय, त्यांना हे माहीत असेल की ते प्रभू श्रीराम यांच्या विचारांवर आधारित आहे.”
“मी सलमानला हेच म्हणेन की माझी गरज जर चांगल्या कामासाठी असेल तर मी नक्कीच तयार आहे. बिष्णोईसारख्या एका चांगल्या समाजाशी बोलण्यासाठी तुम्ही मला बोलवत असाल तर मी नक्कीच जाईन. जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हाच गोष्टी खुलून समोर येतात आणि बोलल्यानेच वाद मिटतात”, असं ते पुढे म्हणाले. मात्र या वक्तव्यात सदावर्तेंनी कुठेच लॉरेन्स बिष्णोईचं नाव घेतलं नाही. गुणरत्न सदावर्ते हे ‘बिग बॉस 18’च्या घरात जवळपास दहा दिवस राहिले. या दहा दिवसांत त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.