दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दलित पँथर चळवळीचे संस्थापक आणि बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या बायोपिकची घोषणा झाली. या चित्रपटात नामदेव यांची भूमिका कोण साकारणार यावरून अद्याप पडदा उचलण्यात आला नाही.
मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संजय पांडे या भव्य चित्रपटाचे निर्माते आहेत. याविषयी ते म्हणाले, “पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशित आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय आणि सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे.”
लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचं महत्त्व व्यक्त केलंय. त्या म्हणाल्या, “काही गोष्टी या सांगायलाच पाहिजे, कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचं जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला. म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.”
नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आज 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्मदिवस आहे. दहा वर्षे झाली, नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झालाय. नामदेव यांचा समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्यांच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्यांचं बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे.”