भाजप नेत्या चित्रा वाघ मराठी मालिकेत दिसणार
BJP Leader Chitra Wagh in Marathi Serial : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या महिलांच्या प्रश्नांसाठी चित्रा वाघ या झगडताना दिसतात. आता त्या मराठी मालिकेत झळकणार आहेत. त्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत? कोणत्या मालिकेत चित्रा वाघ दिसतील? वाचा सविस्तर.......
महिला प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्या अशी चित्रा वाघ यांची ओळख… आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण महिलांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेला त्यांचा लढा, संघर्ष कायम आहे. कधी कोणत्या महिलेवर अन्याय झाला, तर त्या पुढाकार घेऊन प्रश्न सोडवताना दिसतात. पण कायम राजकीय मंचावर दिसणाऱ्या चित्रा वाघ आता मराठी मालिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेत त्या दिसणार आहेत. या मालिकेत त्या महिला शिक्षणावर बोलताना दिसणार आहेत. मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार चित्रा वाघ यांच्याशी संवाद साधताना दिसणार आहे. चित्रा वाघ या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रा वाघ मालिकेत दिसणार
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड येथील आमदार आणि गुहागर येथील सुविद्या कॉलेजचे ट्रस्टी दादासाहेब मोहिते यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकार तिने उघडकीस आणला आहे. याबद्दल राजकीय वर्तुळातील अनेक स्कॅम उघडकीस आणणाऱ्या राजकीय नेत्या चित्रा वाघ यांचीदेखील ‘दुर्गा’ने प्रतिक्रिया घेतली आहे. दुर्गाला तिच्या लढ्यात चित्रा वाघ यांनी पाठिंबा दिला आहे.
View this post on Instagram
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
‘दुर्गा’च्या लढ्याला तिच्या संघर्षाला चित्रा वाघ या मालिकेत पाठिंबा देताना दिसल्या. शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील खूप झटत असतात. अशाप्रकारे आई-वडीलांचे कष्ट आणि मुलांची मेहनत यामध्ये जर असे प्रकार होत असतील.. मुलांना कॉपी करावी लागत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. दादासाहेब मोहिते स्वत: त्यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकारात लक्ष घालतील आणि पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याचीदेखील काळजी घेतील याची मला खात्री आहे. दुर्गा तुझ्या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. एखाद्या मालिकेच्या प्रमोशनसाठी चक्क राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेचं प्रमोशन राजकीय नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. दुर्गाने घेतलेली चित्रा वाघ यांची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.