राज्यनाट्य स्पर्धेत भाजपचा वाढता हस्तक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा आरोप
राज्य नाट्य स्पर्धेत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून केला जात आहे.
Rajya Natya Spardha 2022 : सध्या राज्यात सुरु असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) सांस्कृतिक विभागाकडून केला जात आहे. राज्यात सध्या 19 केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धा सुरु आहे. त्यामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी समन्वयक आणि परीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टी आणि संघाशी संबंधित माणसं असल्याचा आरोप हा राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केला आहे.
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे आरोप काय?
गेल्या सात-आठ वर्षात राज्य नाट्य स्पर्धेच्या संयोजनात भारतीय जनता पक्षाचा संस्कार भारती या नाट्य व साहित्य विधा शाखेमार्फत प्रचंड हस्तक्षेप होत असल्याचा राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडून आरोप होत आहे. महाराष्ट्रात 15 नोव्हेंबरपासून 61 व्या राज्य नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली या स्पर्धेला सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील अनेक रंगकर्मींना हा महोत्सव व्यावसायिक रंगभूमी व चित्रपटांत संधी देणारा ठरला. त्यामुळे गेल्या 61 वर्षांपासून ही स्पर्धा मोठ्या उत्साहात होत असून या स्पर्धेत राज्यातील हजारो कलावंत, लेखक, दिग्दर्शक हे स्पर्धेत सहभाग घेत आहेत.
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा आंदोलनाचा इशारा
आपल्याला न पटणारी विचारधारा मांडून द्यायची नाही. कोणी विचारधारा मांडलीच तर ती विचारधारा, ती मांडणारी संस्था व प्रसंगी विचार मांडणारा व्यक्ती संपविण्याचा सनातनी डाव भाजप खेळत आहे. त्यामुळे भाजपच्या या वाढत्या हस्तक्षेपाचा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून जाहीर निषेध करीत आहे. राज्य सरकारने हा मनमानी व हुकुमशाही कारभार त्वरीत थांबवला नाही तर या गैरप्रकाराविरुद्ध राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने दिला आहे.