Manipur Video : महिलांना प्यादं बनवणं बंद करा… मणिपूर घटनेवर संतापलेल्या प्रियांका चोप्राची पोस्ट व्हायरल
मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे, हिंसाचार उफाळला आहे. त्यातच दोन महिलांची धिंड काढणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
मुंबई | 21 जुलै 2023 : मणिपूरमध्ये (Manipur) गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार पेटलं असून तेथे तणावाचे वातावरण आहे. त्या दरम्यान तेथे दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराचा (manipur video) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या व्हिडीओबद्दल सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. फक्त सामान्य जनताच नव्हे तर नेते, खेळाडू, सेलिब्रिटीही या घटनेमुळे हादरले असून त्यांनी तीव्र शब्दांत या घटनेबद्दल त्यांची मत नोंदवली आहेत.
सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत सुनावले आहे. जया बच्चन, आशुतोष राणा, अक्षय कुमार, रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर यांपासून अनेक सेलिब्रिटींनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. बॉलूविडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही देखील या घटनेमुळे संतापली असून ती देखील याविरोधात सोशल मीडियावर उतरली आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्राम वर एक स्टोरी शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. जमावाच्या बेतालपणावर बोलत त्या महिलांना न्याय मिळावा अशी मागणीही प्रियांकाने केली आहे.की, ‘ या नृशंस गुन्ह्याला 77 दिवस उलटून गेल्यावर , त्यावर कारवाई करण्यापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यामागे काय तर्क आहे ? याचं कारण काय आहे ? आपण कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही प्रकारच्या खेळात प्यादं बनू देऊ शकत नाही.’ अशा शब्दांत या लाजिरवाण्या घटनेबद्दल प्रियांकाने फटकारले आहे.
प्रियांकाने केली न्यायाची मागणी
‘ हे सगळं आप्लाय सर्वांसाठीच अत्यंत लाजिरवाणं आहे, पण या घटनेला, त्यातील पीडितांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी आपल्या संतापाला आवाज देण्याची गरज आहे ‘ अशा शब्दांत प्रियांकाने न्यायाची मागणी केली आहे. त्यासोबतच प्रियांकाने #togetherinshame आणि #justiceforthewomenofmanipur असे हॅशटॅगही या पोस्टसोबत शेअर केले आहेत.